पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सांगितलेल्या आहेत असं काही नाही. 'मनुस्मृती'मध्येही चोरीकरिता नेमक्या अशाच शिक्षा सांगितलेल्या आहेत. शेतकऱ्याच्या घरात तांब्याचा एक पैसा जरी सापडला तरी त्याचे हात कापण्यात यावेत, असं सांगितलेलं आहे. हे सगळे रानटी काळात तयार झालेले धर्मग्रंथ. त्यांचे काय करावे? इंग्रज आल्यापासून हिंदू समाजसुधारकांच्या मनाला एक टोचणी लागलेली होती. ती अशी, की हिंदू समाज एकसंध नाही आणि आम्हाला सामुदायिक प्रार्थना नाही. त्यामुळे आम्ही मुसलमानांच्या हल्ल्यापुढे टिकत नाही आणि इंग्रजांनीही आमचा त्याच कारणाने पराभव केला. त्यामुळे मग सर्वप्रथम, सामुदायिक प्रार्थना सुरू करण्याचा निर्णय समाजसुधारकांनी घेतला. त्यातूनच प्रार्थना समाज उदयाला आला. नंतर गांधींनीही सामुदायिक प्रार्थना सुरू केली. 'भगववद्गीता' हा हिंदूंचा मध्यवर्ती ग्रंथ आहे, अशी जाहिरात करण्यात आली. आर्य समाज, प्रार्थना समाज, विवेकानंद, हेडगेवार या सर्व हिंदू राष्ट्राची बांधणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळींचा प्रयत्न असा होता, की हिंदू धर्मांतील विविधता संपवून, तो ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्मांप्रमाणे एकसंध, एकग्रंथ आणि सामुदायिक प्रार्थना करणारा धर्म बनवावा. आपल्या चालीरीतीसुद्धा सर्वसाधारणपणे एकच असाव्यात, हिंदू धर्म फक्त एकाच राष्ट्रामध्ये असल्यामुळे राष्ट्राने केलेले कायदे मानायला आम्ही तयार आहोत. असं म्हणणं हिंदूंना काही कठीण नाही; पण ज्यांचा धर्म आंतरराष्ट्रीय आहे, ज्यांचे प्रमाणभूत ग्रंथ दुसऱ्या देशात तयार झालेले आहेत, त्यांना जर तुम्ही शरीयतचा कायदा बदलायला सांगितलं, तर ते काही त्यांना सहजच मान्य होणार नाही आणि आम्ही त्यांना असं सांगतो, की तुम्ही या राष्ट्राचे नागरिक आहात ना? मग तुम्हाला हा कायदा मानावाच लागेल, घटनेमध्ये एक मार्गदर्शक तत्त्व असं आहे, की या देशामधल्या सर्व नागरिकांना एकसंध (Uniform) नागरी कायद्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील राहावे. घटनेच्या ४४ व्या कलमात एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून अशी तरतूद आहे. समान नागरी कायदा प्रस्थापित केला पाहिजे, असं काही तत्त्व नाही. प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असं म्हटलेलं आहे. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा बरेच प्रयत्न केले. तेव्हा असं ठरलं, की समान नागरी कायदा तयार करण्याच्या आधी वेगवेगळ्या धर्मांचे आणि जातीजमातींचे जे काही कायदे आहेत, रीतीरिवाज आहेत त्यांचा अभ्यास करावा; मग सर्वप्रथम हिंदू समाजाचा अभ्यास त्यांनी सुरू केला. हिंदू कोड बिल तयार करण्याची आंबेडकरांची फार इच्छा होती. सगळ्या सवर्ण हिंदूंना लागू करणारा कायदा करावा, असं त्यांना वाटायचं. कायदेपंडितांना नेहमीच असं वाटत असतं. तुम्ही कोणत्याही वकिलाशी जाऊन बोला, तो सांगेल, की

पोशिंद्यांची लोकशाही / १८०