पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनेक धर्म आहेत. अनेक संस्कृती आहेत. या सगळ्या विविधतेमध्ये एकता असली, तरी त्याबरोबरच संघर्षही आहे. इतकी विविधता असलेल्या देशामध्ये स्थिर, संपूर्ण बहुमत असलेलं सरकार आलंच कसं? तुमच्याकडं समजा एका पोत्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. तुम्ही त्या पोत्यात हात घालून सँपल काढलं आणि वर आलेल्या सँपलमध्ये सगळेच गव्हाचे दाणे आले, तर काय समजायचं? त्याचा अर्थ असा, की नमुना काढायची पद्धत कुठेतरी चुकत असली पाहिजे; बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकून, नेमके गहूच वर येतील अशी काहीतरी योजना असली पाहिजे.
 विविधतेनं नटलेल्या या देशामधील लोकसभासुद्धा विविधतेनं नटलेली असली पाहिजे. तिथं अनेक प्रकारची मतं, अनेक प्रकारचे विषय, अनेक प्रकारची स्वारस्यं, अनेक प्रकारचे हितसंबंध असले पाहिजेत. लोकसभा ही जर प्रातिनिधिक असेल, लोकसभा हे सँपल असेल आणि ते सँपल जर हिंदुस्थानसारख्या देशामध्ये एका ठशाचं, संपूर्ण बहुमत असलेलं स्थिर सरकार देणारं असेल तर काहीतरी चुकत आहे, असं म्हटलं पाहिजे. एकाच मताचं सरकार आलं, तर त्याचा अर्थ असा, की इथं काहीतरी गडबड आहे, काहीतरी भामटेपणा आहे. हा भामटेपणा काय आहे? ते समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील.
 आपल्या निवडणुकांमध्ये भौगोलिक मतदारसंघ असतात. साधारणतः एक जिल्हा किंवा याचा एक तुकडा, त्याचा एक तुकडा मिळून, लोकसभेचा मतदारसंघ तयार होतो. विधानसभेचा मतदारसंघ म्हणजे साधारणतः एक तालुका किंवा एक ब्लॉक असतो. तुम्ही कोणत्याही उमेदवाराला विचारा, तो म्हणतो, माझ्या मतदारसंघाइतका विचित्र मतदारसंघ दुसरा नसेल! एक तुकडा इकडं, एक तुकडा तिकडं वगैरे वगैरे. तरीसुद्धा सलग भूप्रदेश असलेला मतदारसंघ हा भौगोलिकच असतो. विधान परिषद किंवा राज्यसभेसाठी काही निवडणुका शिक्षक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा वेगवेगळ्या व्यवसायांतून होऊ शकतात. काही लोक निवडून येण्याची शक्यताच नसते. त्यामुळे राष्ट्रपतीला एक अँग्लोइंडियन खासदार नेमण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे; पण असे काही अपवाद सोडले तर लोकसभेमध्ये निवडून येणारे खासदार हे लोकांनी भौगोलिक मतदारसंघांतून निवडून दिलेले असतात.
 आपल्याकडं आणखी एक पद्धत आहे. सर्वांत जास्त मतं मिळवणारा उमेदवार निवडून येतो आणि सगळ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. निवडून

पोशिंद्यांची लोकशाही / १५६