पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आलेला हा उमेदवार; कदाचित त्याला पस्तीस टक्के मतं मिळालेली असतील; पण ती सगळ्यांत जास्त मतं असतील, तर तो उमेदवार निवडून येतो आणि सगळ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. याचा काय परिणाम होतो ते पाहू. मी काही आकडेवारी पाहिलेली नाही; पण ब्राह्मण साडेतीन टक्के आहेत, मराठा तीस टक्के आहेत, मुसलमान अठरा टक्के आहेत, दलित पंधरा टक्के आहेत वगैरे वगैरे, त्यामुळं असं होतं, की जी सर्वांत मोठी जात आहे, ती अल्पसंख्याक असली, तरी तिला निवडणूक जिंकणं सहज शक्य होतं. दुसऱ्या एखाद्या जातीचा प्रभाव जास्त असला, की त्या जातीचा एक खोटा (डमी) उमेदवार उभा करण्यात येतो. उदाहरणार्थ, लिंगायतांमुळे मराठा निवडून येणार नाही असं वाटलं, की लिंगायतांतला एक खोटा उमेदवार उभा करायचा. त्यामुळं लिंगायतांची मतं फुटतात आणि तीस-बत्तीस टक्क्यांवर मराठा उमेदवार निवडून येतो. निवडणुकीचं राजकारण, निवडणुकीचं राजकारण म्हणतात ते हेच! बाकीचेही हेच करीत असतात. याला इंग्रजीमध्ये 'फर्स्ट पास्ट द पोस्ट' असा शब्द आहे. धावण्याच्या शर्यतीत ज्याच्या छातीला पहिल्यांदा दोरी लागली, तो जिंकला. म्हणजे शर्यतीत जो पहिल्यांदा धावत पुढे जातो तो जिंकतो. किती वेळात जिंकला, कसा जिंकला ते बघायचं नसतं.
 समजा, भौगोलिक मतदारसंघांऐवजी जातिनिहाय मतदारसंघ असते, तर काय झालं असतं? तर लोकसभेमध्ये ब्राह्मण, मराठा, दलित, मुसलमान यांची संख्या त्यांच्या-त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणातच राहिली असती. लोकसभेत कुणाही एका पक्षाला, एका जातीला बहुमत मिळू शकलं नसतं; पण आपण जी सँपल काढण्याची पद्धत स्वीकारली आहे, त्या पद्धतीमध्ये ज्या जमातीला पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतं आहेत, त्या जमातीला लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये ५० ते ७० टक्क्यांपर्यंत जागा मिळू शकतात. ही मोठी युक्तीची गोष्ट आहे. भौगोलिक मतदारसंघ आणि 'फर्स्ट पास्ट द पोस्ट' या तऱ्हेची निवडणुकीची रचना असली, की सर्वांत मोठ्या अल्पसंख्याक गटाला प्रमाणाच्या बाहेर प्रतिनिधित्व मिळतं. ही पद्धत आपण इंग्रजांकडून घेतली; पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की इंग्लंडमध्ये काही वेगवेगळ्या जाती नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं दोन पक्षांची पद्धत रूढ झालेली आहे आणि म्हणूनच तिथं भौगोलिक मतदारसंघ असूनही आपल्याकडच्यासारख्या युक्त्या प्रयुक्त्या करता येत नाहीत.
 विभक्त मतदारसंघ आणि आघाड्यांची सरकारं
  स्वातंत्र्यापूर्वी हिंदुस्थानातील मुसलमानांच्या मनात एक फार मोठी भीती

पोशिंद्यांची लोकशाही / १५७