पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महत्त्वाची आहे; पण स्थिर सरकार ही गोष्ट खरंच चांगली आहे का? आपण नेहमी म्हणतो, शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण! शेतकऱ्याचं मरण, म्हणजे देशाचं मरण, असं ज्या सरकारचं धोरण असतं, ते सरकार स्थिर असणं, ते सरकार सामर्थ्यवान असणं हे शेतकऱ्यांच्यासाठी भलं सरकार आहे का? आपलं घर लुटायला येणाऱ्या दरोडेखोराच्या हातात मोठमोठी शस्त्रे असावीत, तो चांगला तगडा असावा, असं म्हणण्यासारखंच झालं हे!
 दुसरा एक प्रश्न असा, की स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांत अल्पमतातलं, अस्थिर सरकार असं किती दिवस होतं? पी. व्ही. नरसिंह राव सरकारची पाच वर्षे अस्थिर धरू. ते सरकार वर्षे पाच स्थिर राहिलं, तरी अल्पमतातलं सरकार होतं. त्या दहाव्या पार्लमेंटची पाच वर्षे, अकराव्या पार्लमेंटची दोन वर्षे आणि त्याच्याआधी जनता दलाची अडीच वर्षे असं सगळं धरून साडेनऊ किंवा जास्तीत जास्त दहा वर्षे अस्थिर सरकार होतं. हिंदुस्थानात तब्बल चाळीस वर्षे भरभक्कम बहुमत असलेलं सरकार होतं. म्हणजे पंतप्रधानानं किंवा कॅबिनेटनं सांगायचं आणि लोकसभेनं त्याच्यावर शिक्कामोर्तब करायचं; चर्चा, विरोध असा काहीही प्रश्न नव्हता. असं स्थिर सरकार चाळीस वर्षे होतं आणि स्थिर सरकार ही जर चांगली गोष्ट असेल, तर पन्नास वर्षांपैकी चाळीस वर्षे सरकार स्थिर असूनही, देशाचं वाटोळं का झालं? स्थिर सरकार ही जर चांगली गोष्ट असेल तर चाळीस वर्षांत देशाचं भलंच भलं व्हायला पाहिजे होतं!
 जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांच्या हातात भरपूर बहुमत होतं. त्यांनी बहुमताचा उपयोग कशासाठी केला? तर गांधीवाद बाजूला टाकून, समाजवाद देशाच्या डोक्यावर लादण्याकरिता. इंदिरा गांधी बांगलादेशच्या युद्धानंतर लोकप्रिय झाल्या. त्यांनी त्या लोकप्रियतेचा उपयोग कशासाठी केला? तर श्रीलंकेमध्ये अतिरेकी पाठवणं, सिक्कीम काबीज करणं किंवा 'गरिबी हटाव'च्या नावाखाली आपल्या पक्षाच्या लोकांना भरपूर पैसे खाता येतील अशा योजना आखणं अशा कामांसाठी केला. राजीव गांधी सहानुभूतीच्या लाटेवर तीनचतुर्थांशी बहुमत घेऊन निवडून आले आणि त्यांनी काय केल? राजीवस्त्रांची आयात, बोफोर्सवर कमिशन खाणं, श्रीलंकेमध्ये सैन्य पाठवणं वगैरे, वगैरे. इतक्या मूर्खपणाच्या गोष्टी केवळ तीनचतुर्थांश बहुमत होतं; म्हणूनच घडू शकल्या! जेव्हा जेव्हा पंतप्रधानांच्या हाती निरंकुश सत्ता येते तेव्हा तेव्हा त्या सत्तेचा गैरवापरच होतो!
 हिंदुस्थान हा विविधतेने नटलेला देश आहे. इथं अनेक तऱ्हांचे लोक आहेत,

पोशिंद्यांची लोकशाही / १५५