पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तयार केलेली गोधडी नाही; एका सुतानं विणलेलं महावस्त्र आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत एक तर्क, एक विचार, सुसंगत मांडणी असलेला हा एक प्रबंध आहे.
 दुसरी गोष्ट म्हणजे या जाहीरनाम्यात एक अत्यंत कठोर आत्मपरीक्षण आहे. लोकांना खुश करण्याऐवजी त्यांना भीती दाखवणारा हा जाहीरनामा आहे. यात असं म्हटलेलं आहे, की लोकहो, तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही योग्य दिशेनं चालला आहात; पण स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षे झाली, तुम्ही चुकीच्या दिशेनं चालला आहात. ज्या देशाच्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल तुम्ही इतके दिवस अभिमान बाळगला, तो देश लवकरच संकटांच्या खाईत पडणार आहे आणि त्याला तुम्ही जबाबदार आहात. आता जर तुम्ही काही धडाडी दाखवली नाही, काही कर्तबगारी दाखवली नाही, तर हा देश वाचणार नाही. कोणत्याही देशातल्या लोकांना असं सांगणं अवघड असतं.
 दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला इंग्लंडचे पंतप्रधान चेंबरलेन यांनी अशी भूमिका मांडली, की पहिल्या महायुद्धात हिटलरवर, जर्मनीवर खूप अन्याय झाला. त्यामुळे आता आपण हिटलरविरुद्ध कडक भूमिका न घेता, त्यांच्या कलानं घेतलं, तर युरोपमध्ये शांतता नांदू शकते. लोक खुश झाले; कारण युद्ध कुणालाही नको असतं. चेंबरलेननं अशी घोषणा केली, की मी एका पिढीमध्ये शांतता आणतो. निवडणूक झाली. चेंबरलेन निवडून आला. त्याचा पक्ष विजयी झाला. तो पंतप्रधान झाला. चर्चिल निवडून आला; पण त्याला मंत्रिमंडळात घेतलं नाही. त्यामुळं तो त्याच्या गावी गेला; पण नंतर जेव्हा हिटलरनं प्रत्यक्ष युद्ध चालू केलं, तेव्हा इंग्लंडच्या राजानं चर्चिलला बोलावून घेऊन, पंतप्रधान केलं. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच, रेडिओवर केलेल्या भाषणात चर्चिल म्हणाला, "मी आज तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. रक्त, घाम आणि अश्रू याशिवाय देशाला देण्याकरिता माझ्याकडं काहीही नाही." अशा तऱ्हेचं वक्तव्य युद्ध तोंडावर आलेलं असताना करणं शक्य आहे. लोकांनाही जाणीव होती, की हे युद्ध आहे, ही काही साधी गोष्ट नाही.
 पण जेव्हा लोकांना युद्धाची जाणीव नाही, संकटाची जाणीव नाही, अशा वेळी त्यांना आश्वासनं देण्याऐवजी पुढं काळ बिकट आहे, कष्ट करायची तयारी ठेवा, असं सांगणारा हा स्वतंत्र भारत पक्षाचा जाहीरनामा आहे. आम्ही लोकांना फक्त एकच गोष्ट देऊ शकतो. गेल्या ५० वर्षांमध्ये झालेली देशाची अधोगती पाहून, ज्यांना दुःख होत असेल, हजारो हुताम्यांनी केलेलं बलिदान फुकट

पोशिंद्यांची लोकशाही / १५२