पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चालल्याचं पाहून, ज्यांना मनातून वेदना होत असतील, त्यांना हा देश पुन्हा एकदा वैभवाच्या आणि कीर्तीच्या शिखरांकडं जाताना पाहाण्याचं सौभाग्य आम्ही देऊ शकतो. आम्ही बाकी काहीही देऊ शकत नाही. अगदी जगाच्या उलटा जाहीरनामा आहे हा.
 या जाहीरनाम्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही जाहीरनाम्यामध्ये येणारी पाच वर्षे गेलेल्या पाच वर्षांसारखीच असतील असं गृहीत धरून मांडणी केलेली असते; पण हा जाहीरनामा वेगळा आहे. येणारा काळ हा गेल्या पाच वर्षांपेक्षा वेगळा असून, देशापुढं एक संकट येतं आहे, अशा एका अर्थशास्त्रीय अंदाजावर हा जाहीरनामा आधारित आहे. हे संकट अगामी पाच वर्षांत जरी कोसळलं नाही, तरी ते पुढच्या काळात लवकरच कोसळणार आहे, एवढं निश्चित. हे संकट इतक्या झपाट्यानं जवळ येतं आहे, की त्याचा मुकाबला करण्यासाठी काहीतरी तयारी करणं अवश्यक आहे. म्हणजेच एका आगामी संकटाची चाहूल देणारा आणि त्याला तोंड देण्याची तयारी करा, असं सांगणारा हा जाहीरनामा आहे.

(शब्दांकन : श्री. रमेश राऊत, औरंगाबाद.)

(२१ जून २०००)

◆◆




पोशिंद्यांची लोकशाही / १५३