पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून नाही, कोणी पंतप्रधान ठरावा म्हणून नाही, कोण्या पक्षाला बहुमत मिळावे म्हणून नाही; तर सगळा इतिहासाचा हेतू पुढे नेण्याकरिता मी फिरतो आहे. एवढी जाणीव जर तुमच्या अंगी तयार झाली, तर तुमच्या अंगात फिरण्याची थोडी ताकद राहील, या उद्देशाने तीन दिवस तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचविला. निवडणुकीच्या जाहीरनाम्याची वेगवेगळी मांडणी मी तुमच्यापुढे केली. त्यातले सगळेच्या सगळे विषय तुम्ही शेवटपर्यंत पोहोचवू शकणार नाही, हे मला माहीत आहे; पण मग या तीन दिवसांच्या प्रशिक्षणातून तुम्ही काय घ्यावे, अशी अपेक्षा आहे?
 या तीन दिवसांत सर्व मिळून मी काय सांगितले? मी जी काही वाक्ये वापरली, अर्थशास्त्र मांडले, ते काही फार महत्त्वाचे नाही. कोणी म्हणाले, रुपयाच्या अवमूल्यनासंबंधी मी केलेले विश्लेषण सर्वांत चांगले झाले. दुसरे कोणी दुसरा कोणता भाग चांगला झाला म्हणाले. मी जे बोलला, त्यातले एकही वाक्य पाठ करून बोलायचा प्रयत्न तुम्ही करू नका. या तीन दिवसांच्या प्रशिक्षणात मी गांधींचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला. मी स्वतः तो पाळतो अशी माझी खातरी आहे. कोणी म्हणतात, "तुम्ही नेहमीच जगाच्याविरुद्ध बोलता!" खरे आहे. कारण, "भेकड माणसांना सोबत लागते. आपल्याबरोबर एकदोन माणसेसुद्धा नाहीत, तेव्हा त्यांना भीती वाटायला लागते. त्यांना वाटू लागते, आपले काही चुकले तर नाही ना, आपल्याबरोबर कोणीच कसे येत नाहीत." माझ्या मनाचा विपरीतपणा असा आहे, की एखाद्या विषयावर विचार करताना माझ्या बरोबरीने तोच विचार दुसरा कोणी करतो आहे असे दिसले, की मला शंका वाटू लागते, की आपले काही चुकत तर नाही ना? मी एकटा आहे, तोपर्यंत मी चुकत नाही याची मला खातरी असते, लोक जमायला लगले, की माझ्या मनात शंका तयार होते, की काही तरी गोंधळ असला पाहिजे.
 आजकाल माणसाचे मोजमाप करण्याच्या अनेक फूटपट्ट्या आहेत - पैसा गोळा किती केला? पदे किती मिळवली? खासदारकी मिळवली का? वगैरे, वगैरे. या सर्व फूटपट्ट्यांपेक्षा एक चांगली महत्त्वाची फूटपट्टी आहे. स्वतःचे मूल्यमापन करायचे झाले, तर फक्त एका प्रश्नाचे उत्तर शोधा. या आयुष्यामध्ये स्वतःशी निष्ठा जास्तीत जास्त तुम्ही बाळगली का आणि त्यातला आनंद तुम्ही मिळवला का? आपला जाहीरनामा म्हणजे, 'आजादी अभियान' आहे; स्वातंत्र्याचा कार्यक्रम आहे. त्यात आपण काय म्हणतो? "स्वतंत्र भारत पक्षाचे दर्शन सर्व स्त्रीपुरुष समान आहेत हे मानते; पण त्या समानतेचा पाया 'प्रत्येक व्यक्ती

पोशिंद्यांची लोकशाही / १४५