पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आवाजाविषयी बोलत नाही; पण माझी निष्ठा ही फक्त माझ्या स्वतःशी आहे.
 गेले तीन दिवस आपण ज्या विचारांची मांडणी करीत आहोत, तो मोठा कठीण विचार आहे. चांदवडच्या महिला अधिवेशनात जमलेल्या लाख लाख स्त्रियांनी जाहीर केले, की 'आम्ही माणूस आहोत,' हे म्हणण्याची हिंमत स्त्रियांनी केली; पण मला चिंता ही आहे, की मिशा वाढविणाऱ्या पुरुषांमध्ये माणसे किती आणि मेंढरे किती याची गणना करू गेलो, तर माणसे मिळणे कठीण आहे. 'आम्हाला कोणी मेंढपाळ मिळतो का?' याच्या शोधात ही सगळी माणसे हिंडत आहेत. मेंढपाळसुद्धा मेंढरे गोळा करायला येत नाहीत; पण 'आम्हाला तुमच्या कळपात घ्या हो,' म्हणून सगळी माणसे धावत सुटलेली आहेत. अशी सगळी देशभर अवस्था असताना, मी तीन दिवस लावून निवडणुकीचा जाहीरनामा म्हणजे एका कागदावर लिहून काढलेली 'आमच्याकडून मिळेल'ची यादी; ती मतदारांना दाखवून, मते मिळवायची अशी आजची पद्धत आणि आमचा जाहीरनामा अठ्ठेचाळीस पानांचा. मलाही समजते, की या अठ्ठेचाळीस पानांतील 'अर्थज्ञान' त्या मतदारापर्यंत पोहोचणार नाही, त्याला समजणार नाही. 'एकच प्याला'मधील तळीराम जसा 'दारू पी' असे सांगणाऱ्या वैदूची निवड करतो, तसे आपले मतदार 'दारू पी' सांगणाऱ्या उमेदवाराला निवडणार आहेत आणि 'कडक पथ्य पाळावी लागतील, व्यवस्थित औषधे घ्यावी लागतील,' असे सांगणाऱ्या आपल्या उमेदवाराला बाजूला सारतील हे मलाही माहीत आहे; मग, या यज्ञाचा, या शिबिराचा खटाटोप मी का केला? हा खटाटोप मी तुमच्याकडे पाहून केला. आपले उमेदवार आणि त्यांचे प्रचारक यांच्याकडे साधने नाहीत, पैसे नाहीत, गाड्या नाहीत; पण या निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्या हिंदुस्थानच्या लोकांना सांगायचे आहे, "अरे, समोर संकट 'आ' वासून उभे आहे." नदीचा एखादा प्रवाह शांतपणे वाहत असतो; पण जरा पुढे गेल्यानंतर एका प्रचंड कड्यावरून धबधब्याच्या रूपाने ते पाणी पडणार असते; पण पुढे कडा आहे याची जाणीव त्या नदीच्या प्रवाहाला नसते. तसाच, सगळा देश पुढे येणाऱ्या संकटाची जाणीव न ठेवता, चाललेला दिसतो. त्यांना त्या संकटाची जाणीव करून देण्याकरिता तुम्ही जायचे आहे, येते सहा आठवडे धावपळ करायची आहे. कोणी उमेदवार तुम्हाला पिठलं-भाकरीसुद्धा देऊ शकणार नाही; घरची भाकरी खाऊन, कदाचित घरचीच सायकल वापरून, चाक पंक्चर झाले, तर आपले आपण दुरुस्त करून फिरायचे आहे. ते काम करताना तुमच्या मनात जाणीव तयार व्हावी, की मी आता जो फिरती आहे तो कोणी उमेदवार निवडून यावा

पोशिंद्यांची लोकशाही / १४४