पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनन्यसाधारण आहे म्हणून समान आहे,' हा आहे," हे अनन्यसाधारणत्व कायम टिकवून, "आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे काम करीत क्रियाप्रक्रिया करीत," स्वतःबरोबरच सर्व समाजाचे भले करण्याचा त्यांचा त्यांचा मार्ग खुला राहावा हे स्वतंत्र भारत पक्षाचे उद्दिष्ट आहे; पण तुम्ही ते अनन्यसाधारणत्व पुसून, जर का स्वतःला शाडूच्या मूर्तीसारखे एखाद्या ठशामध्ये घालून, चारचौघांसारखे करून टाकीत असला, तर तुम्ही स्वतःच्या जन्माच्या हेतूचाच मुळी पराभव करता आहात. मी जन्माला आलो हा असा आहे, मी असा आहे, याबद्दल मला अभिमान आहे असे तुम्ही म्हटले पाहिजे. एका कळपाचा घटक म्हणून 'हिंदू' असल्याचा अभिमान कसला बाळगता, तुम्ही 'मी आहे याच्याबद्दल मला अभिमान आहे,' असे म्हणा आणि त्या व्यक्तित्वाचा परिपोष करताना फायदा होणार आहे का तोटा होणार आहे याचा विचार न करता, 'माझ्या व्यक्तित्वाचा परिपोष करणे' या यात्रेपरता दुसरा आनंद नाही आणि ही यात्रा करताना मी जरी खड्यात पडलो, अत्यंत वेदनामय परिस्थितीत पडलो, नरकात पडलो तरीसुद्धा त्याची जी काही वेदना असेल ती माझी स्वतःची आहे आणि ती सहन करण्यातही मला आनंदच वाटतो, असे म्हणण्याची हिंमत ठेवली पाहिजे. एका इंग्रजी विचारवंताचे वाक्य आहे, "This is my private hell and I am proud of it." स्वतःशी निष्ठा बाळगताना संकटांचा वर्षाव झाला, तरी हा जो काही नरक आहे तो माझा स्वतःचा नरक आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. दुसऱ्या माणसांच्या मदतीने स्वर्ग मिळाला, तरी तो मला नको; पण माझ्या व्यक्तित्वाचा परिपोष करताना होणाऱ्या दुःखातही जो काही आनंद आहे, त्याच्या पलीकडे दुसरा आनंद असूच शकत नाही. या शिबिरात मी तीन दिवसांत एकच गोष्ट सांगितली, "स्वतःच्या व्यक्तित्वाला जपा."
 हे सांगण्यासाठी मी तुम्हा शेतकऱ्यांसमोरच का आलो? मी काही शेतकरी नाही. कापसाला भाव मिळाला तर मला काही जादा पैसे येणार नाहीत; मी वातीपुरतासुद्धा कापूस पिकवीत नाही. मी ऊस पिकवीत नाही... तुमच्या जातीचा नसताना, तुमच्या व्यवसायातला नसताना मी तुमच्याकडे का आलो? हे काम करताना माझा सगळा संसार पेटला, तरी मी तिकडे लक्ष का दिले नाही? मला स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगायचे असेल तर त्यासाठी उभ्या करावयाच्या स्वातंत्र्यलढ्यात सोबतीने लढायला तयार झालेली माणसे भेटलीच, तर ती फक्त या शेतकरी समाजातच भेटतील, अशा आशेने मी तुमच्याकडे आलो आहे. गेल्या सतरा वर्षांत तुम्हा शेतकऱ्यांना काहीही दिले नाही आणि तरीसुद्धा आजच्या

पोशिंद्यांची लोकशाही / १४६