पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शिबिराच्या संयोजकांनी एक मोठी चांगली गोष्ट केली. आपण प्रशिक्षण शिबिर घ्यायचे ठरवले. शिबिर आंबेठाणला भरलं, तर त्याला एक स्वतंत्र वातावरण असते. दुसरीकडे जर कुठे एखाद्या मंगल कार्यालयात, एखाद्या शहराच्या ठिकाणी, व्यवस्था चांगली व्हावी या उद्देशाने भरवले असते, तरी या शिबिराला जितकी रंगत चढली, तितकी चढली असती किंवा नाही, याबद्दल मला शंका आहे. अपघाताने असो की योजनेने असो; पण महात्मा गांधींच्या नावाशी जोडल्या गेलेल्या आश्रमात हे शिबिर भरविण्यात संयोजकांनी समयोचितपणा दाखवला आहे. कारण, या जाहीरनाम्याच्या सुरुवातीलाच म्हटले आहे, की स्वातंत्र्यानंतर गांधीवाद बाजूला टाकून, समाजवादाच्या नावाखाली देशाला ओढले गेले आणि साऱ्या देशाचे वाटोळं झाले; आता या नुकसानीतून देशाला वर कसे काढायचे आणि देशाला पुढे विकासाकडे कसे न्यायचे, हे ठरविण्याचा हा कार्यक्रम आहे. १९८० मध्ये एका पत्रकार बाईंनी माझी मुलाखत घेतली होती, त्या वेळी त्यांनी माझे वर्णन 'Gandhi in dennims' असे केले होते. याच्यापेक्षा मोठा सन्मान काही होऊ शकत नाही, असे मला त्या वेळी वाटले. इतिहासातील एक महत्त्वाचा नियम आहे. इतिहासामध्ये एकच काम पुढे चालविणारे गुरू म्हणा, शिष्य म्हणा किंवा पिढ्यांच्या अंतराने जन्मणारी दोन वेगवेगळी माणसे एकच वेशभूषा घालून कधी येत नाहीत. शिवाजीने जिरेटोप आणि चिलखत घालून, घोड्यावर बसून, जे काम केले ते करणारा शिवाजीचा जो वारस येईल, तो घोड्यावर बसणारा आणि जिरेटोप-चिलखत घालणारा असण्याची शक्यता काहीही नाही. तसेच, एक पंचा नेसून, बापूंनी देशासाठी जे काम सुरू केले, ते काम पुढे चालविणारा मनुष्य पंचा नेसणारा असण्याची शक्यता फार कमी आहे. मी प्रामाणिकपणे मानतो, की गांधीजी ते असताना ते जे काही बोलले, त्याच्याशी मी सांगतो आहे ते सुसंगत आहे किंवा नाही, हे सांगणे कठीण आहे; पण गांधीजी आज जिवंत असते तर ते जी भाषा बोलले असते, ते मी बोलतो आहे. माझ्या या विश्वासावर, स्व. रविशंकर महाराज या निदान एका गांधीवाद्याने शिक्कामोर्तब केले आहे. आमच्या दोघांच्या कार्यपद्धतीत एक साम्य आहे. गांधींनी कोणताही मार्ग ठरविताना, दिशा ठरविताना, कार्यक्रम ठरविताना, विचार पुढे मांडताना जग काय म्हणते आहे, याचा कधी विचार केला नाही. ते उत्तरदायित्व मानीत स्वतःच स्वतःशीच. ते अध्यात्मवादी होते, धार्मिक होते, आत्म्यावर विश्वास ठेवत होते; म्हणून ते आतल्या आवाजाबद्दल बोलत होते. मी धार्मिक नाही, आध्यात्मिक नाही आणि त्यामुळे मी आतल्या

पोशिंद्यांची लोकशाही / १४३