पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मंडळींना सवयच अशी लागते, की कोणत्याही विषयावर बोलायचे झाले तर, पंचेचाळीस मिनिटे बोलायचे. महिनोन् महिने बोलले तरी त्यावर आम्हा प्राध्यापकांना पंचेचाळीस मिनिटांच्यावर बोलता येत नाही, हे जितके खरे तितकेच जो विषय पाच मिनिटांत सहज सांगण्यासारखा आहे, त्याही विषयाला पंचेचाळीस मिनिटे लावायचीच, हीही आमची सवय!
 या शिबिरात आपण तीन दिवस बोललो; माझी अपेक्षा अशी होती, की समारोपाच्या समारंभाला तुम्ही म्हणाल, की आता पुरे, तीन दिवस पुष्कळ ऐकले; पण ती चुकली. मी या शिबिरात तीन दिवस बोललो, एवढेच नव्हे तर, जो विषय बोललो, तो विषय पदव्युत्तर वर्षांच्या वर्गातच शिकवला जातो; त्याआधी नाही. आपल्या शिबिरामध्ये या दीडशेदोनशे विद्यार्थ्यांपैकी बी. ए. एम. ए. झालेले फारसे कोणी असतील असे वाटत नाही; पण मी बोलत असताना हे विद्यार्थी एका कानातून ऐकून, दुसऱ्या कानातून सोडून देत आहेत असे कधी वाटले नाही. उलट, आश्चर्यजनक अनुभव आले. शिबिर दोनच दिवसांत आटोपायचे असे ठरले होते; पण तिसरा दिवस लागेल असे म्हटल्यावर सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. इथल्या व्यवस्थापिका भगिनींनासुद्धा मोठे आश्चर्य वाटले. कारण, आजवरचा त्यांचा अनुभव असा आहे, की शिबिराचे उद्घाटन झाले, की लोक इथून जायचाच विषय काढतात; पण शिबिराचा कालावधी वाढला आणि प्रशिक्षणार्थीना त्याचा आनंद झाला, हे पाहून त्यासुद्धा कुतूहलाने या शिबिरात आवर्जून बसू लागल्या.
 आपण ठरवले, की प्रशिक्षण शिबिर घ्यायचे. मुळात, निवडणुकीच्या जाहीरनाम्याकरिता प्रशिक्षण शिबिर ही हिंदुस्थानात मोठी अद्भुतच गोष्ट आहे. जाहीरनामा म्हणजे नुसती यादी बनवायची - कुणाला काय पाहिजे आणि कुणाकुणाला काय काय पाहिजे याची - असे आजकाल स्वरूप झाले आहे. मग त्याला प्रशिक्षण कशाला हवे? त्यामुळे जाहीरनाम्यावर शिबिर आणि तेही तीन दिवसांचे ही मोठी अद्भुत गोष्ट.
 जाहीरनाम्यावर बोलायला लागल्यानंतर जी काही मांडणी झाली, तिची सुरुवात आम्ही अक्षरशः विश्वाच्या उत्पत्तीपासून केली आणि गंमत म्हणजे शेतकरी संघटनेचा जो एककलमी विषय आहे - शेतीमालाला भाव - तेवढा सोडून या शिबिरात आम्ही जगातल्या सर्व विषयांवर बोललो. सबंध शिबिरात कांद्याचा विषय निघाला नाही आणि साहजिकच आहे, कारण शिबिरात आपण स्वतंत्र भारत पक्षाच्या जाहीरनाम्याविषयी बोलत होतो.

पोशिंद्यांची लोकशाही / १४२