पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१०५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अभद्रवाणी. अर्थशतकभर समाजवाद, औद्योगिकीकरण, सार्वजनिक क्षेत्राचे आधिपत्य, स्वावलंबन इत्यादी तत्त्वांच्या गोंडस मुलाम्याखाली नोकरशाही, लाल फीत, भ्रष्टाचार माजला. पंचाहत्तर पैसे शेतीमालाची सरकारी लूट झाली, कष्टकरी कंगाल झाले, ऐतखाऊंची संस्कृती उभी राहिली. सत्तेशी संबंधित सगळे अमीर बनले. यांपैकी कोणत्याही प्रश्नाविषयी चिंता निवडणुकीच्या कोलाहलात कोठे दिसत नाही.
 माझा पक्ष लहान आहे. लोकशाही म्हणवणाऱ्या या देशात आमच्या पक्षाला मान्यताही मिळू शकत नाही; कारण काय ? समाजवादाच्या निष्ठेची खोटी शपथ घेण्यास आम्ही नकार दिला, एवढेच. प्रामाणिकपणाबद्दल आम्हाला शिक्षा झाली. माझ्या पक्षाला मान्यताही नाही, निवडणूक चिन्ह तर दूर राहिले. 'स्वतंत्र भारत पक्ष,' वय वर्षे फक्त तीन; पण आमच्या स्वतंत्रतावादी विचारांची परंपरा फार मोठी आहे.
 प्रत्येक व्यक्ती ब्रह्मस्वरूप मानण्याची येथील परंपरा आहे. धर्मगुरू, राजसत्ता यांचा बडेजाव न वाढवता, बहुकेंद्रित समाज हा भारतीय आदर्श बळिराज्या'चा म्हणजे खुल्या व्यवस्थेचा पाया आहे. स्वराज्य आंदोलन म्हणजे सर्वच राज्यसत्ता संपुष्टात आणण्याच्या दिशेने पहिले पाऊल असे गांधीजी म्हणत. नेहरू-जमान्याच्या ऐन भरात लायसेन्स-पटमिट-इन्स्पेक्टर राजचा धोका ओळखणाऱ्या दूरदर्शी चक्रवर्ती राजगोपालाचारीच्या 'स्वतंत्र पक्षा'च्या आर्थिक विचारांचा वारसा 'स्वतंत्र भारत' पक्ष सांगतो. 'भीक नको, हवे घामाचे दाम,' या मागणीसाठी चाललेले शेतकरी आंदोलन ही आमची प्रेरणा आहे. १९७९ मध्ये काँग्रेसचे पानिपत करणारा 'जनता पक्ष' आमचा साथी आहे. त्यांच्याच 'चक्र हलधर' या चिन्हावर आम्ही महाराष्ट्रात निवडणुका लढवत आहोत.

 मंदिर, मशीद, मंडल, राखीव जागा, हिंदुत्व, दलितत्व असले लोकांच्या प्राथमिक भावनांना हात घालणारे प्रश्न इतर पक्ष पुढे रेटीत आहेत. स्वस्त तांदूळ, स्वस्त झुणका-भाकर, फुकट घरे, सर्वांना नोकऱ्या, शाळेत फुकट जेवणे असल्या आश्वासनांची आतषबाजी चालू आहे. अशांशी सामना असतानाही आम्ही तुमच्या जातिधर्माला आवाहन करीत नाही, की प्रलोभने दाखवीत नाही. तुमच्या अनन्य व्यक्तिमत्वाला आमचे आवाहन आहे. तुम्हाला दानधर्म करून भीक घालण्याचा आमचा कार्यक्रम नाही. अशी भीक देऊ करणे भारतीय नागरिकाचा अपमान आहे, असे आम्ही मानतो. भारतीय नागरिक आणि समाज कर्तबगार आहे. परदेशांत गेलेले भारतीय नाव कमावतात; धन कमावतात.

पोशिंद्यांची लोकशाही / १०७