पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मात्र असल्या भाषणांचा लोकांना संताप येऊ लागला आहे. देशात ढीगभर पक्ष, सगळेच स्वतःची वाखाणणी करणारे, असे असताना देशाची अशी दैना का? स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांनंतर देशात गरिबी, बेकारी, महागाई थैमान का घालत आहेत ? रस्ते, रेल्वे, पाणी, वीज, दूरसंचार अशा प्राथमिक वस्तूंची आणि सेवांचीही चणचण का आहे ? भ्रष्टाचार, राजकीय गुन्हेगारी, तस्करी आणि गुंडशाही कायदा आणि सुव्यवस्था मोडून टाकण्याइतके प्रबळ कसे झाले ? ठगांचा बंदोबस्त दिडशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी केला होता. ते ठग आता पुन्हा सत्ता कशी गाजवू लागले ? स्वातंत्र्यानंतरच्या भारताचे स्वप्न का नासले ? एकाही पक्षाला भारताची ही घसरगुंडी थांबवता का आली नाही ? निवडणुकीच्या निमित्ताने या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे होती. कोणताही पक्ष या विषयांवर बोलत का नाही?
 आपल्या चुकांचा कबुलीजबाब देणे राज्यकर्त्या पक्षांना सोयीचे वाटत नाही, हे समजण्यासारखे आहे; पण विरोधी पक्षांनी तरी देशाचा नेमका आजार काय आणि त्यावर उपाययोजना कोणती याबद्दल स्पष्टपणे बोलायचे का टाळावे? "आपल्या पक्षाची माणसे सत्तेवर आली म्हणजे सगळे सुरळीत होईल, भ्रष्टाचार संपेल व देशाची भरभराट होईल," असली आश्वासने अनेकांनी दिली. सगळ्या पक्षांचा एकसूत्री कार्यक्रम सत्ता मिळवणे आणि ती मिळाल्यावर टिकवणे एवढाच. पक्षापक्षांत मतभेद असले, तरी ते अणुबाँब, काश्मीर अशा प्रश्नांवर. महत्त्वाच्या आर्थिक प्रश्नावर कोणत्याच पक्षाचे काही स्पष्ट विचार किंवा कार्यक्रम दिसत नाहीत. राज्यकर्त्या पक्षाचे एक तोंड खुलीकरणाची भाषा बोलते. प्रत्यक्षात खुलीकरणाचा कार्यक्रम जुन्या नेहरू व्यवस्थेचेच पुनरुज्जीवन करण्याचा आहे. समाजवादाचा अमल चालू असता, हे विरोधक त्यावर टीका करीत; सरकारने खुलीकरणाची घोषणा करून, विरोधकांना चकवले आणि विरोधक आता तोंड फिरवून नेहरूंची भाषा बोलत आहेत. समाजवाद शब्दाऐवजी 'स्वदेशी', 'हिंदुत्व' असले शब्द ते वापरतात, एवढाच काय तो फरक ! 'स्वदेशी' एवढी गुणकारी असती, तर गेल्या पन्नास वर्षांत आयातीवर हर प्रकारची बंधने घालूनही देश स्वयंपूर्ण का झाला नाही? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. याहूनही मोठा विनोद म्हणजे खुलीकरणाला विरोध करणारे विरोधी पक्ष हाती सत्ता आली, की अर्ध्या रात्रीत खुलीकरणाची भाषा बोलू लागतात आणि आपल्या राज्यात परदेशी गुंतवणूक यावी यासाठी विलायतेच्या वाऱ्या करून, धडपडू लागतात.

 पन्नास वर्षांत साकार झाले ते गांधींचे स्वप्न नाही; खरी ठरली ती चर्चिलची

पोशिंद्यांची लोकशाही / १०६