पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१०६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारतात राहिलेल्यांचीमात्र माती होते. त्याचे कारण स्वातंत्र्योत्तर काळत येथे उभी राहिलेली सरकारशाही व्यवस्था आणि उद्योजकांना स्वार्थी आणि ऐतखाऊंना परोपकारी समजणारी समाजवादी व्यवस्था. भारतातील नागरिकांच्या पायातील समाजवादी बेड्या तुटल्या, तर ते प्रगती करू शकतात. त्यांना सरकारशाहीच्या बेड्यांतून मुक्त करण्याचा कार्यक्रम मी व माझे सहकारी घेऊन उभे आहोत.
 ही सर्व भाषा आपल्याला अनोखी वाटेल. बहुतेक मतदारांना आमच्या कार्यक्रमात रस वाटणार नाही. मंडल, मंदिरांचा कैफ चढल्याने देशाची अवस्था काय आहे, याची स्पष्ट जाणीव कोणाला होत नाही. आम्ही झुणका-भाकर घालत नाही; परंतु आम्ही देश संकटातून सोडवू शकतो.
 अत्यंत सावधानपणे, सखोल अभ्यासांती आमची अशी खातरी पटली आहे, की 'कधी कोणी न ऐकले, ना पाहिले,' असे संकट भारतावर कोसळू पाहत आहे. जुन्या सोव्हियत युनियनच्या प्रदेशांत आज आर्थिक अराजक माजले आहे. तसेच आपल्याही देशात अगदी नजीकच्या भविष्यकाळात होण्याची शक्यता आहे. रशियन लोकांना समाजवादी व्यवस्थेची पापे आणि दुष्कृत्ये समजली आणि ते खुलीकरणाच्या कामाला गंभीरपणे लागले. मार्क्स, एंगल्स, लेनिन, स्टॅलिन यांचे पुतळे उखडू लागले. आमच्या देशात समाजवादी प्रयोगाचे भीषण परिणाम लक्षात आले; पण सरकारी संरक्षणाची ऊब आणि शासकीय खैरातींचा मोह सुटत नाही. म्हणून नेता, तस्कर, गुंडा, अफसर, डावे, उजवे, मंडलवाले, मंदिरवाले समाजवादाच्या चिखलात लोळत राहण्याचा आग्रह धरीत आहेत. परिणाम अटळ आहे. येत्या दोन किंवा तीन वर्षांत प्रचंड आर्थिक अरिष्ट येणार आहे. रस्ते, रेल्वे संचार व्यवस्था आजच खिळखिळ्या झाल्या आहेत, त्या कोलमडून पडतील. ऊर्जा साधने दुर्मिळ होतील, वीज कधी काळी येईल, उद्योगधंद्यांत प्रचंड मंदी येईल. बेकारी वाढेल, भूकमार वाढेल आणि रुपया घसरत घसरत डॉलरमागे ६० रुपयांपर्यंत पडेल. उद्योजकांना वाव देणारी व्यवस्था तयार होईपर्यंत रुपया घसरतच राहील. एकेकाळी डॉलरला वरचढ समजला जाणारा रशियन रुबल साडेसहा हजार रुबल प्रतिडॉलर इतका घसरला. रुपयाची परिस्थिती वेगळी नाही. ऐतखाऊंचे नाणे घसरतच राहणार.

 निवडणुकीच्या तोंडावर, मतपेटीला सामोरे जाताना या धोक्याची सूचना देण्याचे अप्रिय; पण पथ्यकर काम मी करत आहे; अशासाठी, की जेव्हा हे अरिष्ट कोसळेल, तेव्हा, "या संकटाची सूचना आम्हाला कोणी दिलीच नव्हती हो!" अशी तक्रार करायला तुमच्यापैकी कोणाही नागरिकास जागा राहू नये.

पोशिंद्यांची लोकशाही / १०८