केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे वाय. टू. के. अंदाजपत्रक म्हणजे दुप्पट भ्रमनिरास आहे. ते मोठे धडकबाज आणि कठोरही असणार असल्याचे डिण्डिम पिटण्यात आले होते. देश १९९१ सालाप्रमाणे आर्थिक संकटात असताना अर्थमंत्री वित्तीय तूट कमी करण्याच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलतील अशी लोकांची अपेक्षा होती. कारगिल, ओरिसामधील भयानक चक्रीवादळ, राजकीय अनिश्चितता, जगभर खनिज तेलाच्या किमती तिपटीवर पोहोचणे... या घटनांमुळे या वेळचेही अंदाजपत्रक कठोर आणि कल्पकतापूर्ण असणे आवश्यक होते. ही दुहेरी अपेक्षा अर्थमंत्र्यांमधील किमयागारानेही पुरी केलेली नाही. त्यांनी आपले, ना कठोर, ना कल्पकतापूर्ण असे अंदाजपत्रक सादर करण्याचे काम उरकले. काही सवंग विनोद आणि अनाठायी शायरीची उधळण वगळता अर्थमंत्र्यांचे अंदाजपत्रकी भाषण अगदी रूक्ष आणि नीरस होते. दूरदर्शनवरून त्यांचे भाषण पाहणारे त्यांच्यापेक्षा पडद्याच्या तळाशी उमटणाऱ्या शेअर बाजारातील पडत्या किमती आणि निर्देशांक सांगणारा मजकूर अधिक एकाग्रतेने पाहत होते.
अशा प्रकारचे आणखी एखादे अंदाजपत्रक सादर झाले, तर लोक अंदाजपत्रकाच्या दिवशी दूरदर्शनच्या पडद्यासमोर चिकटून बसण्याचे सोडूनच देतील. अंदाजपत्रकावरील चर्चेत भाग घेण्यासाठी गेलो असता, माझे स्वागत करताना एक ख्यातनाम विचारवंत म्हणाले, "स्पष्टच बोलायचे तर, स्वातंत्र्यानंतरचे हे सर्वांत वाईट अंदाजपत्रक आहे." अर्थमंत्र्यांनी आपल्या अंदाजपत्रकात अनेक बाबी 'नव्या नवती'च्या असल्याचे आग्रहाने म्हटले - या दशकातले पहिले अंदाजपत्रक, या शतकातले पहिले, या सहस्रकातील पहिले. सध्या बाजारातही बऱ्याच वस्तू 'सहस्रका'चा छाप आपल्या नावांबरोबर मिरवीत आहेत; पण 'सहस्रका'चा काही विशेष आढळत नाही. वाय.टू. के. अंदाजपत्रकाचीही तीच