Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गत आहे.
 महसूल वाढविण्याच्या बाजूने काही भक्कम पावले उचललेली नाहीत.
 उत्पादन शुल्कासंबंधी सुसूत्रीकरणाचे पाऊल चांगले आहे; पण ते १९८० च्या दशकाला साजेसे आहे, नव्या सहस्रकाला नव्हे.
 शेती उत्पन्नावर आयकर बसविण्यास सुरवात करण्याचा इरादा म्हणजे भिजका फटाकाच नव्हे, तर मोठा विनोद निघाला. फार्महाऊसवर मिळालेल्या उत्पन्नावर आयकर बसविण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडला आहे; पण फार्महाऊसच्या मालकांनी लग्नाच्या पार्ट्या वगैरेसाठी ते भाड्याने देऊन, मिळविलेल्या उत्पन्नावर कर बसविण्यास आजवर काय हरकत होती, याचा खुलासा करण्यासाठी अर्थमंत्रालयाचे कोणी अधिकारी भेटले नाहीत.
 खर्च कमी करण्याच्या बाजूचा विचार केला तर, प्रशासनाचा आकार गंभीरपणे कमी करण्याच्या बाबतीत अपयश हे किमान पन्नास वर्षांचे जुने दुखणे आहे. युरियावरील तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील अनुदाने कमी करण्याचा एक प्रस्ताव अंदाजपत्रकात आहे; पण ही दोन्ही पावले किमान तीस वर्षे आधीच उचलायला हवी होती. या प्रस्तावांवर विरोधक हल्ला करतीलच; पण खुद्द सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षही या प्रस्तावांना प्रखर विरोध करतील. मी हे आता लिहीत असलो, तरी कोणत्या क्षणी हे दोन्ही प्रस्ताव मागे घेतले जातील, हे सांगता येणार नाही. अर्थमंत्रालयाची अधिकृत सूत्रे, अनुदाने कमी करण्याची ही पावले उचलली तरी या दोन्ही बाबींवरील अनुदानांत खऱ्या अर्थाने घट होणार नाही असे सिद्ध करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. सर्वांत जास्त अनुदानाची बाब म्हणजे प्रशासनावरील खर्च; त्याला मात्र बोटसुद्धा लावलेली नाही. शून्याधारित अर्थसंकल्प, प्रस्थापित यंत्रणेची कसून फेरतपासणी, त्यानंतर स्वेच्छानिवृत्तीची आणि सोनेरी हस्तांदोलनाची योजना याबाबत संदिग्ध आश्वासने आहेत; पण सर्वांना माहीत आहे. की त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही आणि सगळ्यांना महागाई भत्त्याची आणखी एक वाढ दिली जाईल आणि खतांवरील व सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील अनुदान कपातीने वाचलेला पैसा गडप होऊन जाईल.

 गरिबी हटविणे, उत्पन्न आणि रोजगार निर्माण करणे, अन्न-सुरक्षेची हमी आणि अनुकूल बाजारपेठ टिकवून ठेवण्यासाठी शेतीक्षेत्राचा विस्तृत आणि कायमस्वरूपी विकास होणे अत्यावश्यक आहे. यावर आपला ठाम विश्वास असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. गेल्या वर्षी पाऊस काही समाधानकारक झाला

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ८६