पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि तो सहन करण्याची मानसिक तयारी अंदाजपत्रकाच्या दिवसापर्यंत बहुतेक कारखानदार, नोकरदारांची झाली होती.
 अंदाजपत्रकाच्या दिवसाच्या सकाळपासून, त्यामुळे बाजारपेठेत काहीसे दडपणाचेच वातावरण होते. ग्रामीण जनतेच्या आधारावर निवडून आलेल्या राष्ट्रीय मोर्चाच्या पहिल्या अंदाजपत्रकात शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर यांच्याकरिता काही ठोस कार्यक्रम असणार आणि त्याचा भार या वेळी 'इंडिया'वर पडणार हे अपरिहार्य आहे असे सर्वांना वाटत होते.

 १९ मार्च १९९० रोजी संध्याकाळी पाच वाजता अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांनी अंदाजपत्रकी भाषण वाचायला सुरुवात केली आणि त्यानंतर काही मिनिटांतच ही धास्ती संपून गेली. नव्या अंदाजपत्रकात नवे काहीच नाही, हेही अंदाजपत्रक आपलेच आहे याची जाणीव मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, दिल्ली येथील शेअर बाजाराच्या व्यवहारात दिसून आले. मुंबईच्या शेअर बाजाराचे अध्यक्ष श्री. मल्ल्या म्हणाले, "शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शासन करते की काय अशी चिंता पडली होती; पण अर्थमंत्र्यांनी कर्जमुक्ती आटोक्यात ठेवली, ही मोठी समाधानाची गोष्ट आहे. पगारदारांना आयकरातून सवलत मिळाली याचा आनंद झाला." सरकारचे उत्पन्न वाढविण्याकरिता कोणतीही नवी प्रतिभाशाली कल्पना अंदाजपत्रकात दिसली नाही. पेट्राल, सिगारेट यांसारख्या काही महागड्या चैनीच्या वस्तू यांच्यावर कर बसवले असूनही, त्याची फारशी चिंता किंवा पर्वा 'इंडिया'त दिसली नाही, पेट्रोल महागले म्हणून त्याचे ओझे गाडीमालकावर पडत नाही, ते ओझे शेवटी तो वेगवेगळ्या मार्गांनी दुसऱ्यांवर ढकलून देतो. रेफ्रिजरेटर महाग झाले, तर त्याचा काच रेफ्रिजरेटर वापरणाऱ्या वर्गाला जाणवत नाही. कारखानदार, व्यापारी वाढत्या कराचा बोजा सहजच ग्राहकांवर आणि शेवटी शेतकऱ्यावर टाकू शकतात. चैनीच्या वस्तूंवर कर लावून, आपण मोठी समाजवादी झेप घेतली अशी बढाई अर्थमंत्र्यांनी कितीही आवेशाने मारली, तरी त्याची कसलीही धास्ती भांडवलदारांना वाटलेली दिसली नाही. अंदाजपत्रकाचे भाषण संपले आणि शहरांत सगळीकडे आनंदीआनंद झाला आणि त्याबरोबरच करात आणखी सूट मिळायला पाहिजे होती, अशी हाकाटीही सुरू झाली. अंदाजपत्रकापूर्वीचे धास्तीचे वातावरण पार संपून गेले. पक्ष बदलला, माणसे बदलली; तरी नवे सरकार आपलेच आहे, याचा पुन्हा एकदा प्रत्यय येऊन, धनिक मंडळी सुखावली. याउलट ग्रामीण भागात निराशेचे सावट पसरले. अंदाजपत्रकाच्या बातम्या ऐकायला आपले मोडके तोडके ट्रांझिस्टर्स लावून गावकरी मंडळी घोळक्याने जमून, मोठ्या

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ९