Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मारायचा आणि त्याला एखाद्या कप्प्यात बंद करून टाकायचं म्हणजे मग आपल्या डोक्याला ताप नाही असा आपल्या सर्व 'विचारवंतांचा' खाक्या.
 हल्ली माझीसुद्धा ओळख करून देताना लोक मला 'खुल्या व्यवस्थेचा समर्थक' म्हणतात. मी खरंच 'खुल्या व्यवस्थेचा समर्थक' आहे का? मला वाटतं मी असलोच तर 'बंदिस्त व्यवस्थेचा विरोधक' आहे. आज कोणत्याही सामाजिक दुःखाकरिता, कोणत्याही सामाजिक अन्यायाकरिता मग ते दुःख, अन्याय किती का भयानक असेना, ते दूर करण्याकरिता शासन नावाच्या राक्षसीच्या हाती मी कणमात्रसुद्धा सत्ता द्यायला तयार होणार नाही. शासन कोणतीही समस्या सोडवत नाही कारण शासन हीच समस्या आहे. ही माझी आजची भूमिका; ही माझी भूमिका उद्या असेलच असं सांगता येत नाही.
 समाजवाद संपला यात काही वाद नाही, पण भांडवलशाही जिंकली ही कल्पनाही तितकीच खोटी. भांडवलशाही समाजवादाच्या आधी संपलेली आहे. पण फक्त भांडवलशहांनी ग्रंथबद्धता, ग्रंथप्रामाण्य न मानल्यामुळे त्यांचा पाडाव कधी झाला हे पुराव्यानं दाखवता येत नाही. समाजवाद्यांनी ग्रंथप्रामाण्य मानल्यामुळे त्यांचा पाडाव झालेला इतका ढळढळीत दिसतो, की तो त्यांचा त्यांनासुद्धा नाकारता येणं अशक्य आहे. पण, याचा अर्थ व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय झाला असं मी मानीत नाही.
 कदाचित, ऐंशीनव्वद वर्षांनी अशी यंत्रं तयार झाली की ज्यायोगे दिल्लीत बसूनही आंबेठाणसारख्या कोपऱ्यातील गावातली पिके कशी आहेत हे पाहता आले तर नियोजनाचा आजवर झाला असा बट्ट्याबोळ होणार नाही. कदाचित दुसऱ्या ग्रहावरील आक्रमणं सुरू झाली किंवा एका बाजूला पृथ्वीवरील लोक आणि दुसऱ्या बाजूला इतर ग्रहांवरील लोक असं विज्ञानकूटकथांसारखं चित्र जर उभं राहिलं तर सगळ्या पृथ्वीवरील देशांचं नियमन करणारं एक नियोजन करणारं एखादं शासन उभं राहू शकतं अशी कल्पना करता येईल. पण आजच्या परिस्थितीमध्ये नियोजन व्यवस्थेचा पाडाव झाला आहे यात शंका नाही.

 लोकसभेमध्ये विश्वासाच्या ठरावावर बोलताना आमचे पंतप्रधान म्हणाले, की 'रशियाचा पाडाव का झाला? माझे काही रशियातले उच्चपदस्थ मित्र म्हणतात की आमच्याकडे पक्ष होता, शासन नव्हते म्हणून रशियाचा पाडाव झाला.' मी एक लेख लिहून म्हटलं, No Prime Minister, तुमची चूक आहे. रशियाच्या पाडावाचा खरा निष्कर्ष असा की आजपर्यंत मनुष्यजातीने व्यक्तीच्या स्वतःच्या प्रेरणांपलीकडे अधिक विश्वसनीय अशी काही फूटपट्टी शोधून काढलेली नाही.

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ७६