उद्या निघणार नाही असं मी म्हणत नाही. काही कायमचं लिहू नये. कायमचं लिहिण्याची हौस मार्क्सला होती आणि जे लोक दोनशे आणि तीनशे वर्षांचं भविष्य सांगण्याचा आग्रह धरतात, ते वीस वर्षसुद्धा टिकत नाहीत.
मनुष्यजातीमध्ये एक एक परिवर्तन घडतं आहे. मनुष्य व्यक्ती म्हणून जन्मलेला नाही. जीवशास्त्रीयदृष्ट्या तो व्यक्ती म्हणून जन्मतो; पण तो एखाद्या समाजाचा भाग, टोळीचा भाग, गावाचा भाग, जातीचा भाग, धर्माचा भाग म्हणून जगतो. पहिल्या संस्कृती झाल्या, त्या नदीच्या काठी गाळपेराच्या जमिनीमध्ये, शेतीवर आधारलेल्या संस्कृती होत्या. त्याच्यामध्ये काम करणारे श्रमिक तयार झाल्यानंतर श्रमिकांवर आधारलेल्या संस्कृती तयार झाल्या. श्रमिकांच्या हाती साधनं मिळाल्यावर उत्पादकता वाढते, हे लक्षात आल्यानंतर भांडवलवादी व्यवस्था तयार झाल्या. त्या भांडवलवादी व्यवस्थेचे दोन भाग म्हणजे एक अमेरिकन भांडवलवाद आणि दुसरा रशियन समाजवाद - दोघंही भांडवलावर आधारित आहेत.
नवी संस्कृती अवतरते आहे, तिला काय नाव द्यावं? मी तात्पुरतं नाव दिलं आहे उद्योजकतावाद. उद्योजकतावाद तयार होतो आहे. जमीन (Land) महत्त्वाची नाही, श्रम (Labour) महत्त्वाचे नाहीत, भांडवल (Capital) महत्त्वाचं नाही तर योजकता (Enterprise) म्हणजे उत्पादनाचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे हे मानणारी व्यवस्था तयार होते आहे आणि या संदर्भामध्ये आपल्याला 'सामना'मधल्या सामन्याकडे पाहिलं पाहिजे.
'स्वार्थ' हा शब्द बदनाम झाला आहे आणि शिवराज गोर्ल्यांनी आयन रॅण्डचं नाव वापरलं; म्हणून मी त्यांना प्रेमळ सल्ला देतो, की मांडणी करताना समाजवाद म्हटलं, की लगेच प्रतिक्रिया म्हणून स्वार्थवाद म्हटलंच पाहिजे असं नाही. किंबहुना, तुम्हाला जे काही म्हणायचं आहे, ते स्वार्थवादानं होत नाही. आयन रॅण्डनीसुद्धा या विचाराला Virtue of Selfishness म्हणून थोडं नुकसानच केलं आहे. मला मुद्दा टाळायचा नाही, त्याची मांडणी कशी करावी याबद्दल बोलतो आहे.
माझा विचार साधा आहे, की एका व्यक्तीसारखी दुसरी कोणती व्यक्ती असू शकत नाही. प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्त्व हे अनन्यसाधारण आहे. हे जर असेल, तर या विश्वाचा जो काही व्याप आहे याचा अनुभव घेण्याची आणि सिद्धांत समजून घेण्याची माझं शरीर ही एक अनन्यसाधारण व्यवस्था आहे. मी जो अनुभव घेऊ शकतो तो दुसरा कोणी घेऊ शकत नाही. मी माझ्या बारीकशा छिद्रातून जगाकडे पाहतो आहे; पण माझं हे स्वतःचं छिद्र पवित्र आहे, दुसऱ्याचं