पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सामाजिक पातळीवर होऊ शकतात, असं मानतात ते समाजवादी आणि त्याबरोबर सर्वसाधारण मनुष्य हा षड्रिपूंनी ग्रासलेला असतो, त्याचं 'अंततोगत्वा' हित काय आहे हे त्याला समजत नाही, ते सांगणारे आम्ही आहोत असं म्हणणारे आध्यात्मिक, धार्मिक, राष्ट्रवादाची कल्पना मांडताना धर्माचा आधार घेणारे म्हणजे समूहवादाच्या दुसऱ्या भागातले. असं एखादं पात्र या कादंबरीत आलं असतं, तर जास्त चांगलं झालं असतं. आणखी एक. केवळ तुम्ही सुलाख्यांवर तुटून पडू नका आणि केवळ काका टापऱ्यांवर तुटून पडू नका. सुलाख्यांकडून लायसेन्स-परमिट घेऊन, आपली कारखानदारी उभी केलेले, ज्यांच्याकडे उद्योजकतेचा लवलेश नाही आणि केवळ लायसेन्स-परमिटच्या आधाराने कारखानदार झाले असंही एखादं पात्र असतं, तर 'सामना'तलं चित्र जरा जास्त संपूर्ण झालं असतं.
 या कादबंरीतला एक मुद्दा फार चांगला वाटला. सुलाख्यांकडे लायसेन्स-परमिट मिळवायला जायला लागतं; पण जेव्हा अनंतराव स्वतःच्या कारखान्यामध्ये एक लहानसं यंत्र तयार करू पाहतात, तेव्हा इंग्रजांच्या अमदनीतला इंग्रजी साहेब हा 'नवाथेनगर'ला येऊन, अनंतरावांचं कौतुक करतो. मला वाटतं, की ही घटना महत्त्वाची आहे. इंग्रजांच्या राज्यामध्ये जे काही चाललं होतं, तो सर्व अन्यायच होता, जुलूमच होता असं अप्पासाहेब ज्या ज्या प्रकरणात नायक आहेत त्या त्या प्रकरणात वाटतं. जालियनवाला बाग, रौलेट, सायमन वगैरे वगैरे घटना पाहिल्या म्हणजे वाटणारंच, की इंग्रजांचं राज्य म्हणजे जुलूमच होता. पण, अनंतरावांचं प्रकरण उघडलं, की त्याच्यामधला इंग्रज हा वेगळ्याच तोंडवळ्याचा दिसतो. खरी परिस्थिती काय होती?
 मला वाटतं, इथे जोतीबा फुल्यांचा संदर्भ घेणे सयुक्तिक ठरेल. इंग्रज हा परकीय आहे. तो आमच्या भल्याकरिता आलेला नाही. तो इथून एक दिवस जाणार आहे हे नक्की. पण, तो जाण्याच्या आधी निदान इथल्या सर्वसामान्य माणसांना विद्या मिळवून शहाणं व्हायची संधी मिळाली आहे. ती संधी घेतल्याखेरीज जर का इंग्रजांना आपण काढून लावलं, राजकीय लढ्यालाच महत्त्व दिलं, तर काय होईल? याचं जोतीबा फुल्यांनी समोर ठेवलेलं चित्र या कादंबरीत आपल्याला अवतरलेलं दिसतं.
 अनंतरावांचा वाद हा उद्योजकतावाद नाही, या वादाच्या मागे आणखी काही जास्त व्यापक भूमिका आहे असं मला वाटतं.

 आपल्याकडे शब्दाचं मोठं दारिद्र्य आहे. कुणीतरी काही वेगळं करायला लागला, की त्यावर आपल्याजवळील तुटपुंज्या शब्दसंपत्तीतील एखादा शिक्का

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ७५