बोलण्याचा प्रसंग बऱ्याच वेळा येतो आणि एक मोठी भीती वाटते.
उद्योजकतेचा अर्थ
कारखानदारी करण्याच्या उत्साहाने आणि ऊर्मीने अनेक तरुण गेल्या पन्नास वर्षांत पुढे सरसावले आणि समाजवादी अर्थव्यवस्थेत त्यांचा फज्जा उडाला. लायसेन्स-परमिट व्यवस्थेत नावाचे कारखानदार प्रत्यक्ष सरकारी आधिपत्याखालील मॅनेजर आणि तेही वेगवेगळ्या इन्स्पेक्टरांच्या पलटणींसमोर झुकून झुकून सलाम घालणारे अशी त्यांची परिस्थिती झाली. या नवीन पिढीच्याहीबाबत असेच घडले, तर मग काय होईल? उद्योजकता म्हणजे नोकरी न करणे, उद्योजकत्व म्हणजे थाटमाट व अफाट उत्पन्न अशा कल्पना घेऊन ही मंडळी बाजारपेठेत उतरली, तर त्यांचा चट्टामट्टा करायला अनेक लांडगे तयार बसलेले आहेत.
उद्योजकता म्हणजे काय ? याची व्याख्या आत्म्याच्या व्याख्येप्रमाणे 'नेति नेति' म्हणजे हे नाही ते नाही अशी द्यावी लागेल किंवा भगवत् गीतेतील स्थितप्रज्ञाच्या व्याख्येप्रमाणे ज्याला सख-दःख,शीत-उष्ण यांचे सोयरसतक नाही. जो आनंदाने मोहरून जात नाही व दुःखाने गांगरून जात नाही, जो सदासर्वकाळ सर्व चित्तवृत्ती जागृत ठेवतो, योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतो; पण फलाच्या आकांक्षेविषयी निःस्पृह राहतो अशी काहीतरी द्यावी लागेल. एक गोष्ट नक्की, की उद्योजक बनण्याचा काही फॉर्म्युला किंवा मूस नाही. गणपती यायच्या आधी गावगल्लीतील ठराविक मुशीतून एकसारख्या आकाराच्या गणपतीच्या मूर्ती पाडणारे पेठा स्थापतात. उद्योजक कोणत्याही ठशातून तयार होत नाही. उद्योजक म्हणजे गणपतीचा मूळ ठसा बनविणाऱ्या शिल्पकारासारखा असतो. गणपतीची मूर्ती कशी असते याचा पक्का अभ्यास असतो; पण नव्याने जी मूर्ती घडवायची, त्यात सगळेच काही नवीन, ते त्याने आपल्या कलेच्या व आत्मविश्वासाच्या आधाराने घडवायचे असते.
सतीचे वाण
मी आपल्या पायावर उभा राहीन, स्वतंत्रपणे मानाने जगेन, दोन वेळा फाके पडले, तरी चालतील; पण पोटाची खळगी भरण्याकरिता काहीतरी पाट्या टाकण्याचे काम करणार नाही अशी बेदरकारपणाची मानसिकता उद्योजक होण्यासाठी आवश्यक आहे. कलाकारात असा कलंदरपणा आढळतो. आध्यात्मिकात अंगावरील कपड्याचे भान नसलेले अवधूत असतात. कलाकार व अवधूतांपेक्षाही उद्योजक ही वरची श्रेणी आहे. आजूबाजूच्या संपूर्ण परिस्थितीचे संपूर्ण ज्ञान, विज्ञान व त्यासाठी