पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागणारे तंत्रज्ञान, दूरदृष्टी, हिशेबीपणा व सर्व असूनही सगळेच झुगारून देण्याची तयारी असे हे उद्योजकतेचे रसायन आहे. माकडापासून माणूस झाला, त्याच सुरावर माणसातून उद्योजक तयार झाला, असे म्हणावे इतके हे उद्योजकतेचे रसायन खास आहे.
 दुर्दैवाने भारतात उद्योजकत्वाला आजपर्यंत कधी फारशी प्रतिष्ठा मिळाली नाही. वर्णव्यवस्थेत उद्योजक हे सर्व वैद्य किंवा शूद्र मानले जात. मुसलमानी दरबारात कलावंतांना मान होता. बिदागी होती; पण दरबाराबाहेर नाही. इंग्रजांच्या काळात काही जमातींनी उद्योगधंदे उभारले, त्यांच्याविषयी प्रतिष्ठित समाजाची भावना उपेक्षेचीच नाही, तर तुच्छतेची होती. फायदा मिळवणारे ते सारे तुच्छ ही स्वातंत्र्योत्तर काळातील पंडित नेहरूंपासून खालपर्यंत सर्वांचीच भावना.
 उद्योजकतेचे रोपटे खुल्या हवेत चांगले वाढते, फुलते व फळते; समाजवादी किंवा हुकूमशाही वातावरणात ते कोमेजून जाते. रशियाच्या अवतीभवतीच्या सर्व देशांतील नागरिकांचा हा अनुभव आहे. कोणत्या तरी एका पाळीला नेमून दिलेल्या कामाच्या जागी जावे. ठराविक काम करावे. घरी परत यावे. दीड-दोन खोल्यांची जागा, जे सरकार देईल, त्यात समाधान मानावे. आठवड्याला दोनऐवजी तीन अंडी मिळू लागली, तर समाजवादाच्या अंतिम विश्वविजयाची ती द्वाही असल्याची डिंग मारावी...असे खुरटलेले आयुष्य काढलेल्यांना उद्योजक बनायचे कसे जमावे? पंख कापलेल्या पक्ष्यांसारखी त्यांची स्थिती. पिंजरा उघडून दिला तरी पंख पसरून भरारी घेणे त्यांना शक्य नाही.
 उद्योजकतेस मारक वातावरण
 भारताचा पन्नास वर्षांचा समाजवादी अनुभव इतका जालीम व जुलमी नव्हता हे खरे; पण उद्योजकांचे पंख छाटण्याचे काम झाले. शेतीत तर झालेच. शेतीसंबंधी उद्योग काढायचा म्हणजे पाचपन्नास शेतकऱ्यांना गोळा करून, थोडे भांडवल जमा करायचे. सरकार दरबारी लटपटी करून मान्यता व वित्तपुरवठा करायचा. त्यानंतर तंत्रज्ञान सरकारी, भांडवल, सामग्री सरकारी, सगळे व्यवस्थापन सरकारी अशा तऱ्हेच्या कारखानदारीचे कर्णधार सरकारमहर्षी, उद्योगमहर्षी म्हणून गाजले. या अशा परिस्थितीत या नवीन तरुणांचा निभाव कसा काय लागायचा?

 शेतीतील काम संपले, म्हणजे कापणी, मळणी झाली, की शेतकरी माल बाजारात घेऊन जातो. फारच थोडे शेतकरी माल साठवून बाजारातील किमती वधारण्याची वाट पाहू शकतात. माल टिकाऊ असो की नाशवंत असो, शेतकऱ्याला माल बाजारात नेण्याची मोठी घाई होते.

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ५७