Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नोकरी मिळत असती तर यातील काही मंडळी तरी उद्योजक होण्याच्या नादाला लागली नसती. शेतीचा व नोकरीचा धोपटमार्ग सोडून उद्योजकत्वाची वहिवाट नसलेली बिकट वाट त्यांनी धरली ती, पुष्कळशी, पर्याय नाही म्हणून.
 सल्लागारांचा भूलभुलय्या
 मारून मुटकून का होईना; पण उद्योजक व्हायचे ठरले. जागेची सोय आहे; थोडेफार ज्ञान आहे. पाचपन्नास हजार रुपये म्हटले तर उभे करता येतात; पण नेमके कोणत्या दिशेला जावे हे त्यांना समजत नाही. कशाचे उत्पादन करावे, त्यासाठी कच्चा माल कसा मिळवावा, तंत्रज्ञान कोणते वापरावे, बाजारपेठेसाठी तो माल आकर्षक कसा करावा आणि देशी-विदेशी बाजारपेठेत तो कसा खपवावा ? याची त्यांना फार थोडी कल्पना असते. याविषयी कोणी मार्गदर्शन करेल का? कोणी सल्ला देईल का ? याची ते मोठी डोळ्यात प्राण आणून वाटत पाहत असतात.

 बहुधा याच कारणाने अलीकडे जिकडेतिकडे शेती आणि प्रक्रिया उद्योग यांना सल्ला देणारे व मार्गदर्शक उदंड झाले आहेत. जिकडेतिकडे शेतीची प्रदर्शने भरतात. फळे, भाजीपाला, फले यांच्या उत्पादनासंबंधी रोज नवी-नवी पुस्तके येत आहेत. आधुनिकतम तंत्राने शेती कशी करावी व कापणी-मळणीनंतर प्रक्रिया इ. उद्योग कसे चालवावे यासंबंधी गावोगावी परिसंवाद, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे चालू आहेत. उद्योगार्थी मोठ्या आशेने अशा ठिकाणी जमतात. मोठ्या तन्मयतेने व श्रद्धेने मार्गदर्शकांचे बोल टिपून घेतात. आपल्याकडे कोणी शास्त्रज्ञ, उद्योजक थोडाच भेटणार आहे. संबंधित विषयावरील दोनचार इंग्रजी पुस्तके पाहिलेला, काही प्रायोगिक शेतीचा वसा घेतलेला, एखाद्या उद्योजकाचा स्पर्श झालेला - तोही चुटपूट. काही मार्गदर्शक सल्ला देणाऱ्या संस्था चालवतात किंवा अशा संस्थांत नोकरी करतात. काही दुसरे यंत्रसामग्री इत्यादींचे कारखानदार किंवा वितरक असतात. बोलतानाचा त्यांचा थाट मात्र सर्वज्ञाचा ! "सर्व गोष्टींना सोडून मला शरण या, मी तुम्हाला तारून नेण्यास समर्थ आहे, ऐहिकच नव्हे तर पारमार्थिक यशाचा मार्ग मी तुम्हास दाखवतो,' अशी कृष्णार्जुनसंवादी भाषा ते वापरतात. हे परिसंवाद, कार्यशाळा पंचतारांकित विश्रामालयांच्या वातानुकूलित सभागृहात होवोत का आडोशापुरते उभारलल्या मांडवात होवोत. यांची वेशभूषा साहेबी. मराठी बोलण्यात आपल्याला खूपच त्रास पडतो असा एकूण आव; पण पाऊण तासाच्या एकूण बोलण्यात बिनचूक इंग्रजी वाक्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. हे दृश्य पाहिले, की नव्याने उद्योजक होऊ पाहणाऱ्या या तरुण मंडळींच्या भवितव्याविषयी मोठी चिंता वाटू लागते. अशा मंडळींशी

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ५५