Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 एक संप कर्मचाऱ्यांचा
 ११ मे रोजी पुन्हा एक दिवसाचा लाक्षणिक संप झाला. या वेळी अधिकारी कामावर होते; पण कर्मचारी कामावर नव्हते. ११ तारखेची निवड संपासाठी मोठ्या हुशारीने करण्यात आली होती. १२ ला शिवजयंतीची सुटी, १३ अक्षय्य तृतीयेचा एक कामाचा दिवस की नंतर १४ आणि १५ ला शनिवार आणि रविवार अशी मोठी नामी युक्ती कर्मचाऱ्यांच्या युनियनने आखली होती. त्यानंतर २४ मे आणि २-३ जून या दिवसांच्या संपाचेही कार्यक्रम जाहीर झाले होते. यंदा लाक्षणिक संपांच्या दिवसांची एकूण संख्या सात.
 एक बँकीय अनुभव
 रोख पैशाची विशेष गरज पडल्यामुळे मी स्वतःच पैसे काढण्याकरिता बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेलो. काउंटरपाशी एकही कर्मचारी बसलेला नव्हता. काऊंटरमागील टेबलांवर मात्र अर्धा डझन अधिकारी आपली थकीत कामे उरकत असल्याचे दिसत होते किंवा भासवत होते.
 त्यातील सर्वांत जवळच्या एकाचे लक्ष मी वेधून घेतले आणि मला पैसे काढायचे असल्याचे सांगितले. हा अधिकारी माझ्यासारख्या कोणा प्रश्न विचारणाऱ्याची उत्सुकतेने वाट पाहत असावा असे दिसले. मोठ्या विजयी सुहास्य मुद्रेने 'आज बँकेत कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे सर्व व्यवहार बंद असल्याचे' त्यांनी सांगितले.

 बँकेत काही कर्मचाऱ्यांचा संप असणे ही बँकेची अंतर्गत बाब आहे. त्यात मला काही स्वारस्य नाही. मला माझे पैसे, बँकेकडे जमेसाठी ठेवलेले परत हवे आहेत, बँकेची ती कायदेशीर जबाबदारी आहे, असे काहीसे ऐकवल्यानंतर तो अधिकारी म्हणू लागला, "मी या शाखेतील अधिकारी नाहीच - मी लेखा परीक्षेकरिता येथे आलो आहे." आवाज ऐकून शाखाप्रमुख बाहेर आले. नमस्कार- चमत्कार केला. आत येऊन खोलीत बसा अशी आदरातिथ्याची विनवणी झाली; पण मी काउंटरसमोर राहून पैसे काढणार आहे असे सांगितल्यावर सगळे आदरातिथ्य बाजूला झाले आणि 'कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे काही व्यवहार होणार नाहीत,' असे त्यांनी विनम्रतेने; पण खंबीरपणे सांगितले. मी युक्तिवाद घातला- 'आज बँकेची सुटी नाही, माझ्या खात्यात पैसे आहेत, ते देण्यास बँकेने नकार दिला तर कायद्याप्रमाणे हा गुन्हा होतो, बँकेने दिवाळे काढले आहे असा त्याचा अर्थ होतो;' पण शाखाप्रमुखांची भूमिका पक्की. 'आता तुम्हाला आम्ही काय सांगणार? पण आज पैशाचा व्यवहार होणे शक्य नाही.

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ४४