पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भांडवलनिर्मिती करण्याकरिता शेतीस आणि शेतकऱ्यास बुडवण्यात आले. शेतीतील बचत वापरून, परदेशी तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री यांच्या आधाराने औद्योगिक क्रांती आणण्याचा प्रयत्न झाला. कारखानदारीची एवढी घाई या नियोजनात होती, की देशातील बचतीच्या गतीपेक्षा जलद वाटचाल करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजण्यात शासकीय व्यवहारात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे आणि तुटीची रक्कम भरून काढण्याकरिता सरळ नोटा छापणे हा एक मार्ग. दरवर्षी जवळजवळ १० कोटी रुपये नोटा छापून उभे केले जातात.
 यापलीकडे भर म्हणून परदेशांतून मोठ्या प्रमाणावर कर्जे घेण्यात आली. तंत्रज्ञान विलायती, यंत्रसामग्रीही बहुधा विलायती, ती विकत घेण्याकरिता लागणारा पैसाही विलायती आणि ही सर्व कारखानदारी चालवणारी माणसेही विलायती आचारविचाराची. देशाचे विलायतेवरील परावलंबित्व पराकोटीचे वाढले; पण ही चैनचंगळ कधी तरी थांबणारच ! कधी तरी एकदा बिल देण्याची वेळ येणारच. ही परिस्थिती १९८० च्या आसपास आलेली होती; पण त्या वेळी दोन गोष्टी भारताच्या दृष्टीने सुदैवाच्या घडल्या. भारतातील पेट्रोलच्या साठ्यांचा शोध मोठ्या प्रमाणावर लागल्यामुळे तेलाच्याआयातीचा बोजा आटोक्यात राहिला आणि परदेशांत, विशेषतः मध्य-पूर्वेत कामासाठी गेलेल्या छोट्या माणसांनी-परिचारिका, सुतार, गवंडी यांनी मोठ्या प्रमाणात रकमा हिंदुस्थानात पाठवल्यामुळे निदान परकीय चलनाची स्थिती बरी राहिली; पण दोन गोष्टी तात्पुरत्या आहेत, त्यावर विसंबून राहता येणार नाही याची जाणीव राजीव शासनाने दाखवली नाही. अमर्याद अनिर्बंध आयातीसाठी दरवाजे खुले करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले आणि मग जे अपरिहार्य होते, ते झाले. इराक, कुवेत प्रकरणामुळे पेट्रोलपुरवठ्याची स्थिती बदलली आणि भारतीय नागरिक पाठवत असलेल्या पैशाचा ओघही आटला. आजची गंभीर परिस्थिती इराक युद्धाने तयार झालेली नाही. १९८० च्या जुजबी कुबड्यांच्या आधाराने अर्थव्यवस्था चालू होती, त्या कुबड्या काढून घेतल्या, एवढेच.

 परदेशांकडून घेतलेली ही प्रचंड कर्जे फेडली जाण्याची काय शक्यता आहे? भारतात कारखानदार आहेत, उद्योजक नाहीत; संघटित क्षेत्रात नोकरशहा आहेत, सधन कामगार आहेत, कार्यक्षमता नाही. या कारखानदारीत वापरले जाणारे तंत्रज्ञान जुनेपुराणे ठरले आहे. अशा कारखानदारीत तयार झालेला माल आपण निर्यात करू शकू आणि त्यातून कर्जफेड करू शकू, अशी सुतराम शक्यता नाही. आजही भारत निर्यात करतो, ती कापड, चामडे आणि कच्चा माल यांचीच. कारखानदारी मालाच्या भारतातील किमती या इतर देशांच्या तुलनेने खूपच जास्त आहेत. त्यांची

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / १९