कर्ज ही काही मोठी चिंतेची बाब नसते. टाटा, बिर्ला, किर्लोस्कर या कंपन्यांना प्रचंड कर्जे आहेत. किंबहुना त्यांची कर्जे हेच त्यांचे वैभव आहे. त्यांना कर्जे देण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात. भागभांडवल, कर्जरोखे, ठेवी या स्वरूपात दरवर्षी प्रचंड रकमा या कंपन्या गोळा करत असतात. कर्ज फेडता न येणे, ही चिंतेची बाब आहे, कर्ज असणे ही नाही. ही गोष्ट शेतकऱ्यास सहज समजेल आणि पटेल. सोसायटीकडून कर्ज घेण्यात काय वाईट आहे? आलेल्या पिकांतून जर सर्व कर्ज व्याजासकट फेडून टाकता येत असेल, तर कर्ज ही मोठी सोय आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेतले. जमिनीचे काम केले, विहिरीचे काम केले. त्या कामामुळे उत्पन्न वाढले आणि त्या उत्पन्नातून बँकेचेहप्ते ठरलेल्या मुदतीत व्याजासकट फेडता आले, तर कर्जाची चिंता करायचे काय कारण?
जे शेतकऱ्यांना समजते, ते राष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर पडलेल्या नेत्यांना समजते आहे असे वाटत नाही. नाणेनिधीकडून नवीन कर्ज घ्यावे किंवा नाही याच विषयावर काहीसा वितंडवाद चालू आहे; पण त्या वादातही गंभीरता नाही. कर्ज घेतल्याशिवाय आज पर्याय नाही. हे सर्वांना माहीत आहे. कर्जात बुडालेला शेतकरी उद्या दरवाजाशी भांडीकुंडी घेऊन जाण्याकरिता जीपगाडी येणार आहे, हे कळले तर कोठूनही अगदी पठाणी व्याजानेसुद्धा रक्कम जमा करू पाहतो, त्याला सोसायटीच बऱ्यापैकी व्याजाने उचल देऊ लागली, तर सोसायटीचे आभार मानायला पाहिजे. निदान उद्याचा दिवस टळला. तसेच नाणेनिधी कर्ज देण्यास तयार आहे. भाग्याची गोष्ट आहे. उद्याची देशाची नादारी टळली म्हणजे उद्या द्यायचे व्याज आणि परतफेडीची रक्कम धनकोच्या हातात ठेवता येईल; देश अक्षरशः नादारीच्या कड्यावर उभा असताना कोणतेही कर्ज घेण्याबाबत फारशी चिकित्सा आणि घासाघीस शक्यही नाही. दुसऱ्या काही मार्गाने परकीय चलनाची परिस्थिती थोडीफार सुधारता येईल. इतर काही देशांकडून कर्जे मिळवण्याचा प्रयत्न करता येईल. परदेशस्थ भारतीयांना हिंदुस्थानात ठेवी ठेवण्याची विनंती करता येईल; पण या प्रयत्नांची फळं काही महिन्या-दोन महिन्यांत दिसू लागणार नाहीत. किंबहुना गेल्या काही काळात परदेशी सरकारांकडून मिळणारी अधिकृत कर्जे अधिकाधिक दुर्मिळ होत आहेत. त्यामुळे अधिक चढ्या व्याजाची कर्जे व्यापारी बँकांकडून आणि संस्थांकडून घेणे केंद्र सरकारला भाग पडत आहे. परदेशस्थ नागरिकांच्या ठेवीचा झराही आटतो आहे आणि शेवटी त्याचा व्याजाचा दर चढाच असणार. थोडक्यात उद्यावर येऊन ठेपलेली बदनामी टाळण्याकरिता नाणे निधीचे कर्ज घेण्याशिवाय काही गत्यंतर नाही.