पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाले आणि डोलू लागले. चिदंबरम यांचे पहिले अंदाजपत्रक स्वप्नवत म्हणून गाजले होते, या अंदाजपत्रकाचा परिणाम गारुड्याच्या पुंगीसारखा डोलवणारा होता.
 वित्तमंत्र्यांनी २००४-०५ सालची संपुआ शासनाची आर्थिक कामगिरी सांगितली. आर्थिक वाढीची गती जवळजवळ ७%, उद्योगधंद्यांच्या वाढीची गती ६% च्या आसपास. शेतीची प्रगती खुंटलेली खरी; पण त्याचा दोष पावसावर ढकलता येतो. संपुआ शासनाच्या सुरवातीच्या महिन्यात शेअर बाजार कोसळला होता. कोषीय (Fiscal) स्थिती ढासळल्याने महागाई भडकली होती. पण, हळूहळू शेअर बाजार सावरला. संपुआवरील डाव्या पक्षांच्या प्रभुत्वामुळे गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झालेला संशय निवळू लागला. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, चिदंबरम् ही त्रयी डाव्यांच्या सापाला ताब्यात ठेवू शकतात; या सापाचे दात पाडण्याचे व विष उतरवण्याचे कौशल्य या त्रयीत आहे याची प्रचीती आल्यानंतर शेअर बाजारातील तेजीने उच्चांक ओलांडून भरारी मारली. महागाई वाढण्याची गती कमी झाली.
 भाषणाची सुरवात तर उत्तम झाली. आता पुढे? वित्तमंत्र्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) शासनाची खिल्ली उडवली. गेल्या वेळच्या आर्थिक सर्वेक्षणात त्यांनी 'रालोआ शासनाच्या कारकिर्दीत देशातील आर्थिक परिस्थिती सुदृढ असल्याचे' सर्टिफिकेट दिले होते. या वेळी त्यात थोडी सुधारणा केली. 'रालोआ'चे वित्तमंत्री नशीबवान होते. पण, रालोआच्या कारकिर्दीतील अर्थव्यवस्थेच्या बाळशात काही छुपे आजारही होते. त्यांचा परिणाम संपुआ शासनाला भोगावा लागल्याचे, त्यांनी आवर्जून सांगितले.
 संपुआ शासनाला प्रचंड नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. त्सुनामीचा प्रलय, काश्मिरातील प्रचंड हिमपात इथपासून अगदी मांढरादेवीच्या चेंगराचेंगरीपर्यंत उल्लेख झाला. श्रोत्यांची सहानुभूती मिळाली. या सर्व संकटांना तोंड देऊन, संकटग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे खंबीर आश्वासनही दिले. या संकटप्रसंगी शासकीय यंत्रणेची अकार्यक्षमता उघडी पडली होती, त्याचा मात्र उल्लेख नाही. धोक्याची पूर्वसूचना देण्याची व्यवस्था शासनाने बासनात बांधून ठेवली नसती, तर हजारो लोकांचे प्राण वाचले असते याचाही उल्लेख अनावश्यक ठरला.
 आता पुढे ? अर्थातच, संपुआच्या राष्ट्रीय समान किमान कार्यक्रमाची भलावण. त्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अर्थकारण आम आदमी करिता नसल्याची टीका. एवढे नमन झाल्यावर वित्तमंत्र्यांनी आपला नवा खेळ मांडायला सुरवात केली.

 आता केवळ 'गरिबी हटाओ' नाही, तर गरिबी आणि बेरोजगारीवर 'हल्ला

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / १०४