Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२००५ च्या अंदाजपत्रकामागील आडाखे आणि अंदाज


 फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत केंद्र शासनाचे इसवी सन २००५-२००६ चे अंदाजपत्रक सादर झाले.
 संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारचे प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग स्वतः जागतिक कीर्तीचे गाढे विद्वान अर्थशास्त्री. १९९३ मध्ये देशाची सारी अर्थव्यवस्था कोसळायला आली होती. परकीय चलनाच्या गंगाजळीचा खडखडाट झालेला. देशातील सोने गहाण ठेवून, अर्थव्यवस्था चालविण्याची वेळ आलेली. त्या वेळचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव - नेहरू खानदानाबाहेरचे पंतप्रधान - यांनी हिंमत केली या देशाला विनाशाकडे वेगाने नेणारी नेहरूप्रणीत समाजवादाची गाडी थांबवून, नवे मुक्त अर्थव्यवस्थेचे शिंग फुंकले. त्या कामगिरीतील प्रमुख जबाबदारी पार पाडण्याचे श्रेय त्यांचे वित्तमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशात, जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे त्यांनी चमत्कार घडवून आणला. उत्पादन वाढू लागले, निर्यात वाढली, गुंतवणूक वाढू लागली, परकीय चलनाचा वेग शुक्लेंदुवत वाढत चालला.
 या कर्तबगारीची प्रभावळ असलेले डॉ. मनमोहन सिंग आज स्वतः पंतप्रधान. त्यांचे वित्तमंत्री पी. चिदंबरम्, खुल्या व्यवस्थेचे धोरण बिगर काँग्रेसी शासनकाळातही कुशलतेने पुढे नेऊन दाखविलेले, अर्थशास्त्र आणि कायदा या दोन्ही क्षेत्रांतील अभ्यास व व्यासंग यांनी ख्याती पावलेले. त्यापलीकडे , मृदु स्वभाव, भाषेवरचे प्रभुत्व, मंद हास्य आणि शांत प्रवृत्ती इतक्या गुणांचा समुच्चय असलेले हे वित्तमंत्री.

 २८ फेब्रुवारीला चिदंबरम बोलू लागले आणि लोकसभेतील खासदार, प्रेक्षकसज्जातील श्रोते, पत्रकार आणि देशभर दूरचित्रवाणी संचांसमोर बसून त्यांचा शब्द न् शब्द कानात साठवून ठेवणारे नागरिक ऐकू लागले, मंत्रमुग्ध

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / १०३