पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नियमबध्दतेला जास्त प्राधान्य व प्रतिष्ठा या धोरणाद्वारे दिली गेली. यातूनच सुटण्यासाठी भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबण्यावाचून गत्यंतर नव्हतं. कारण जितकी बंधने जास्त तितका भ्रष्टाचार जास्त असा नियम आहे, आणि भ्रष्टाचार करू न शकणाऱ्या प्रतिभावंत लोकांसमोर देश सोडून दुसरीकडे संधी शोधण्याखेरीज पर्याय नव्हता. अशा तऱ्हेने भ्रष्टाचार व 'ब्रेन ड्रेन’ या समस्यांची कीड उद्योगक्षेत्राला लागून ते कमजोर झाले.
 सुदैवाने गेल्या काही वर्षांत आर्थिक धोरणांमध्ये कमालीचा बदल करण्यात आला आहे. लायसेन्स राज, सुरक्षित बाजारपेठ व राष्ट्रीयीकरण या 'कासवछाप' त्रिसूत्रीऐवजी जागतिकीकरण, मुक्त स्पर्धा व खासगीकरण या नव्या प्रागतिक त्रिसूत्रीचा स्वीकार करण्यात आला आहे. थोडक्यात सांगायचं तर जुन्या परंपरा मोडून नवीन ध्येयधोरणे आखली जात आहेत. उद्योगक्षेत्राला यांचा फायदा असा होत आहे व पुढेही होत राहील.मात्र यासाठी व्यवस्थापकांनी जुनी मानसिकता मोडण्याची तयारी दाखविली पाहिजे.आणि या करिताच कासव संस्कृतीची जागा 'शिक्षण संस्कृती’ने घेतली पाहिजे.
'शिक्षण संस्कृती'चे महत्त्व:
 कासव संस्कृतीतून मुक्त होण्याचा सहजसाध्य मार्ग म्हणजे नित्य, नव्या गोष्टी शिकून घेण्याची सवय लावून घेणं.आपण एखाद्या संस्थेत कामाला आहोत.तेथे आपल्याला ठराविक काम नेमून देण्यात आलं आहे. अशा स्थितीत केवळ ते एकच काम आपल्या जीवनाचं ध्येय आहे असं मानणंं व नवी कामंं किंवा कौशल्यंं आत्मसात करण्याचा प्रयत्नही न करणंं, ही 'कासव वृत्ती'झाली.सांप्रतच्या काळात उद्योग व व्यवस्थापन क्षेत्रात ती उपयोगी पडणार नाही.कारण आपल्या ठराविक कामात आपण कितीही प्रवीण असलात तरी त्या कामाची बाजारी किंमत केव्हा नाहीशी होईल आणि आपल्या संस्थेला आपण काम करत असलेला विभाग किंवा आपले काम केव्हा बंद करावं लागेल हे सांगता येणार नाही. तसंच केवळ आपल्यासाठी ते काम सुरू ठेवणंं संस्थेला फार शक्यही होणार नाही.अशा वेळी आपण दुसऱ्या काही कौशल्यांचा विकास केला असेल, तर आपण दुसऱ्या विभागात काम करू शकाल.वेळप्रसंगी संस्था बदलू शकाल किंवा स्वतःची संस्था स्थापनही करू शकाल आणि जगाच्या बाजारात टिकून राहू शकाल. मात्र नवीन शिकण्याची वृत्ती नसेल तर आपलं ठराविक काम हातचे गेल्यानंतर घरी बसण्याची पाळी येईल. म्हणूनच ‘शिक्षण संस्कृती'चा उदय व्यवस्थापकाच्या मनात होणंं आवश्यक आहे. अनेक संस्थांनीही ही परिस्थिती लक्षात घेऊन व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना बहुश्रूत बनविण्यासाठी सोयी-सुविधा देण्याच्या योजना राबविल्या आहेत.

 क्रिकेटचंं उदाहरण देऊन हा मुद्दा अधिक चांगल्या तऱ्हेने पटवून देता येईल.

मानसिकताबदलणेआवश्यक/८४