पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/९४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सध्या ‘वन डे’ क्रिकेटचा जमाना आहे. झटपट मॅच व झटपट निकाल हे सूत्र आहे. पाचपाच दिवस चालणारे आणि अखेरीस बहुतेक वेळा अनिर्णीत राहणारे सामने पूर्वीच्या काळी लोकप्रिय होते तसे आज राहिले नाहीत.पाच दिवसांच्या सामन्यांच्या संघाची ‘समाजरचना’ सहा फलंदाज, चार गोलंदाज व एक यष्टिरक्षक अशी ढोबळमानाने असे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण असं तिन्ही करू शकेल असे खेळाडू मोजकेच असत आणि काही सन्माननीय अपवाद वगळता अशा खेळाडूंचं महत्त्वही निव्वळ गोलंदाज यांच्या तुलनेत कमी असे. मात्र ‘वन डे' क्रिकेटचा उदय झाल्यानंतर अशा 'अष्टपैलू' खेळाडूंना इतकं महत्त्व प्राप्त झालं की, पूर्वी केवळ फलंदाजी किंवा गोलंदाजी यापैकी एकच गोष्ट करणारे खेळाडूही काळाची गरज म्हणून आणि संघातील स्थान टिकवून धरण्यासाठी दुसरीही गोष्ट शिकून घेऊ लागले व कित्येक जण त्यात तरबेजही झाले.
 सचिन तेंडुलकरचंच उदाहरण पाहा. एकदिवसीय क्रिकेट नसतंं तर तो गोलंदाज झालाही नसता. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर वन डे क्रिकेटमुळे अष्टपैलू खेळाडूंचंं महत्व व संख्या वाढली. शिवाय वन डे क्रिकेटमध्ये चांगल्या क्षेत्ररक्षणाला अनन्यसाधारण महत्व असल्याने सर्वच खेळाडू त्याकडे लक्ष देऊ लागले. परिणामी त्यांचा 'फिजिकल फिटनेस’ सुधारला. अशा तऱ्हेने वन डे क्रिकेटमुळे क्रिकेटमधील अनेक परंपरा मोडीत निघाल्या, पण क्रिकेटचा दर्जा व लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. याचा फायदा पारंपरिक पाच दिवसीय क्रिकेटलाही होत आहे.म्हणजेच क्रिकेटच्या गुणवत्तेत वाढ झाली.
 वन डे क्रिकेटचा उदय झाल्यानंतर प्रथम 'क्रिकेट भ्रष्ट झालं, क्रिकेटचा पोरखेळ झाला. त्या पध्दतीच्या क्रिकेटमुळे क्रिकेटचा नाश होईल' इत्यादी प्रक्रिया व्यक्त झाल्या. मात्र कालांतराने कसोटी व हा नवा प्रकार दोन्ही जोडीने नांदू लागले.थोडक्यात परंपरा मोडल्यामुळे परंपरेचांही फायदा झाला.
 उद्योग क्षेत्रातही असंच परिवर्तन होत आहे.व्यवस्थापकांनीही केवळ पारंपरिक पध्दतीने विचार न करता ‘अष्टपैलू’ बनण्याचा प्रयत्न करावा. यामुळे त्यांंच्या ‘जॉब सिक्युरिटी'मध्ये उलट भरच पडेल. अनेक संस्थांमधून आता असे प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहेत आणि वन डे क्रिकेटमुळे जसा क्रिकेटचा 'ओव्हरऑल’ फायदा झाला. तसा उद्योगक्षेत्रातील या बदलांमुळे संपूर्ण उद्योगक्षेत्राचाही होणार आहे. अनेक उद्योगांनी हे लक्षात घेऊन पावलंं टाकण्यास सुरुवात केली आहे.
 लवचिकता व अधिकार :

 नव्या आर्थिक धोरणांचा फायदा उठविता यावा व समाजरचनेमुळे तोटा होऊ नये

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/८५