पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उपाध्याय ; कौशल्य शिकविणाऱ्यास आचार्य, अंतर्दृष्टी देणाऱ्यास द्रष्टा व शहाणपण देणाऱ्यास गुरू म्हणतात. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचा गुरू होणं आवश्यक आहे.
 कर्मचाऱ्याचे योगदान मूल्य हे माहिती, ज्ञान व कौशल्य यात त्याने केलेल्या प्रगतीवर अवलंबून असतं. मात्र त्याचं परिवर्तनमूल्य अंतर्दृष्टी व दूरदृष्टीवर निर्भर असतं.अंतर्दृष्टी व दूरदृष्टी कमावण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपल्या विचारांना लावलेली झापडं काढून टाकणे गरजेचे आहे.
विश्राम मूल्य :

 आपल्या कुटुंबाची करावी तशी संस्थेची काळजी असलेल्या कर्मचाऱ्याच्या जीवनात एक दिवस असा येतो की, त्याच्या दुसऱ्या दिवशी तो कामावर येणार नसतो.त्याच्या निवृत्तीच्या दिवशी त्याला समारंभपूर्वक निरोप दिला जातो. हारतुरे होतात. स्तुतिपर भाषणं होतात आणि कर्मचाऱ्याच्या मनात त्याचवेळी, उद्या काय करायचं हा विचार थैमान घालत असतो. निवत्तीनंतरचा काळ कित्येक कर्मचाऱ्यांसाठी भयावह असतो. नोकरीत असताना मिळणारा मानमरातब, अधिकार, प्रतिष्ठा आणि पत संपलेली असते, पण त्या भोगायची सवय सुटलेली नसते. अशा स्थितीत कित्येकांना मानसिक आजारपण येतं. रिकामा वेळ खायला उठतो. कधीही संपणार नाही असं वाटणारी पोकळी जाणवू लागते. मग घरातल्या माणसांवर चिडणं, आक्रस्ताळेपणा करणं आदी सवयी लागतात. काही जण व्यसनाधीन होतात. अशी परिस्थिती ओढवू नये म्हणून नोकरीत असल्यापासूनच तयारी करून ठेवावी लागते. या कामी व्यवस्थापनानेही कर्मचाऱ्यांना सहकार्य करणं आवश्यक असतं. नोकरी सुरू असतानाच कला जोपासणं,चांगले छंद जोपासणे, समाजकार्यांत भाग घेणं, इत्यादी उपक्रमाद्वारे निवृत्तीनंतरच्या समाधानी आयुष्याची तजवीज केली जाऊ शकते. अनेक कंपन्या अशा तऱ्हेच्या सोयी कर्मचाऱ्यांंना उपलब्ध करून देतात. त्याचा दृश्य फायदा कंपनीला होणार नसला तरी कर्मचाऱ्याचं निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं जावी यासाठी पेन्शन, ग्रॅच्युएटी इत्यादी आर्थिक तरतुदींप्रमाणेच कंपनीने शक्य असल्यास अशा सुविधाही कर्मचारी नोकरीत असताना पुरवाव्यात अशी अपेक्षा मानवतावादी दृष्टिकोनातून केली जाते व ती अनाठायी आहे असं म्हणता येणार नाही. कारण हाही मनुष्यबळ विकासाचाच एक पैलू आहे.

मनुष्यबळाचा आदर व विकास/५८