पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हात स्वच्छ असतील, तर स्थिरताही लाभते. त्यामुळेच ९५ टक्के माणसं या पर्यायाला प्रथम प्राधान्य देतात.
 सुरक्षितता व स्थिरता यांच्या जोडीला संस्थेकडून माणसाला पुढील तीन फायदे मिळतात.
 १. पगार, भत्ते, सोयीसवलती व पद (डेसिग्ननेशन)
 २. काही तरी करून दाखविण्याची व स्वतःचा विकास करून घेण्याची संधी.
 ३.आपले सहाध्यायी, वरिष्ठ, कनिष्ठ, ग्राहक, पुरवठादार, कामगार पुढारी, कर्मचारी यांच्याशी येणाऱ्या संपर्कातून होणारी मैत्री व त्यांच्यासाठी काम केल्याने मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा.
 हे फायदे मिळविण्यासाठी आपण संस्थेला -
 १) आपला वेळ
 २) आपली बुध्दी व क्षमता
 ३) आपली कार्यशक्ती व उत्साह
 हे तीन स्रोत पुरवत असतो.
 या देवाणघेवाणीतून संस्था व माणूस यांच्यात एक वैशिष्ट्यपूर्ण संबंध निर्माण होतो. या संबंधाचे अनेक पदर असतात. संस्थेशी सहकार्य, काही वेळा काही बाबतीत विरोध,संस्थेत आपल्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांशी आपली वर्तणूक,त्यांची आपल्याबरोबरची वागणूक, संस्थेशी संबंधित असलेल्या पण संस्थेबाहेरच्या माणसांशी संपर्क, त्यातून निर्माण होणारे ताणतणाव (आणि काही वेळ बेबनावदेखील), गटबाजी, इत्यादी वळणंं घेत हे संबंध दृढ होतात. जीवनातील सुरक्षेकरिता आपल्याला संस्थेची गरज असते, तर संस्था प्रगतिपथावर राहण्यासाठी तिला माणसांची गरज असते.
 संस्थेबरोबरचे कर्मचाऱ्याचे संबंध त्याचा स्वभाव, तो पारखण्याची संस्थेची (म्हणजेच संस्थेच्या व्यवस्थापनाची) कुवत व संस्थेची कार्यपध्दती यावर अवलंबून असतात. हे संबंध जितके मधुर तितकी संस्था तिच्या उद्दिष्टपूर्तीत यशस्वी होते व कर्मचाऱ्यालाही समाधान मिळते.
 या संबंधामधूनच ‘मनुष्यबळ’ व्यवस्थापन ही संकल्पना रूढ झाली. कर्मचारी व संस्था यातील संबंध अधिकाधिक सहकार्याचे बनविणे आणि दोघांनीही समजून घेऊन परस्परांच्या हिताचा व्यवहार करणे हे या संकल्पनेमागचे प्रमुख तत्व आहे.

 मनुष्यबळ हा कोणत्याही संस्थेचा प्रमुख आधारस्तंभ असतो आणि त्याचं व्यवस्थापन तितकंच अवघड असतं. कारण माणूस यंत्राप्रमाणे त्याच्या चालकाच्या सदैव कह्यात

व्यवस्थापनासमोरील आव्हान/५२