पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहू शकत नाही. त्याला आपलं स्वतंत्र अस्तित्व, भावभावना, कार्यशक्ती, उपजत प्रज्ञा व मर्यादा असतात आणि हेच त्याच्या 'जिवंतपणा'चे लक्षण असतं.
 आचार्य विनोबा भावे यांच्या मताप्रमाणे जगात चार प्रकारची माणसे असतात.
 १) सुस्त, (२) व्यस्त, (३) त्रस्त, (४) मस्त.
 सुस्त म्हणजे आळशी, कामाची टाळाटाळ करणारा, व्यस्त म्हणजे नेहमी कामात असण्याचा आविर्भाव करणारा, पण प्रत्यक्षात फारसे काही न करणारा, त्रस्त म्हणजे कधीही समाधानी नसणारा आणि सर्व काम आपल्यावरच पडते अशी नेहमी तक्रार करणारा व मस्त म्हणजे उत्साहाने रसरसलेला, नेहमी नव्या कल्पना लढविणारा व खऱ्या अर्थाने कार्यरत मनुष्य.
 यापैकी पहिल्या तीन प्रकारच्या माणसांमध्ये कार्यक्षमता नसते किंवा कमी असते असं नाही तर ती वापरण्याची त्यांची इच्छा नसते. त्यांचा स्वभाव आड येतो. अशा व्यक्तींकडून अपेक्षित कार्य करून घेणं हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचं कौशल्य आहे.
 'सैन्य हे पोटावर चालते' असे नेपोलियनने म्हटलं आहे. म्हणजेच कर्मचाऱ्याला दिला जाणारा पगार व आर्थिक फायदा हा त्याला काम करण्यास उद्युक्त करतो. कारण मुळात नोकरी करण्याचा उद्देशच अर्थार्जन हा असतो. त्यामुळे मनुष्यबळ व्यवस्थापनातही या बाबीला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. संस्थेत कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापनाबरोबर सर्वात मोठ्या प्रमाणावर वादंग होत असेल तर ते ‘पगारा'बाबत होतात. संस्थेची प्रगती, प्रतिष्ठा व ती वाढविण्यासाठी करावी लागणारी राबणूक याबाबत कर्मचारी व व्यवस्थापन यात दुमत नसते, पण पगाराचा प्रश्न आला की बच्याचदा गाडं अडतं. ‘आम्हाला समाधानकारक पगार द्या, मग आम्ही संस्था कुठल्या कुठे नेतो ते पाहा’ हे कर्मचाऱ्यांचे ब्रीदवाक्य असतं. व्यवस्थापनालाही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालत नाही. मात्र प्रत्यक्ष जीवनात पगाराइतकं किंवा त्याहूनही अधिक महत्त्व संस्थेकडून मिळणाच्या दुसऱ्या व तिसऱ्या फायद्यात आहे,हे कर्मचार्याला अनुभवातून कळून येतं.
 पैसा जीवनासाठी आवश्यक असला तरी कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचं समाधान केवळ तेवढ्यावरच होऊ शकत नाही. संस्थेत मिळणारी विकासाची संधी तितकीच महत्त्वाची आहे. पैसा पोटाची काळजी घेतो, तर संस्थेतील आपली देखणी कामगिरी मानसिक समाधान मिळवून देते. संस्थेत कर्मचाऱ्याला मान व मोठेपणा प्राप्त करून देते. कर्मचाऱ्याच्या कामगिरीचा फायदा संस्थेच्या खात्यावर जमा होतो हे जरी खरं असलं तरी तो आपण करून दिला आहे, ही जाणीव कर्मचाऱ्याला अधिक उत्साहित व कार्यशील बनवते. ते त्याचं जणू ‘टॉनिक’ ठरतं.

 माणूस समाजप्रिय प्राणी आहे. त्याला नेहमी अवतीभोवती आपल्यासारख्या इतरांचं

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /५३