पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कन्सल्टन्सी:
 नोकरी सुटल्यानंंतरच्या काळात अर्थार्जन, कार्यमग्नता व प्रतिष्ठा यासाठी 'कन्सल्टन्सी' हा व्यवसाय बरेच जण पत्करतात. नोकरीत असताना जे काम आपण करीत होतो त्याबाबत इतरांना सल्ला देणं, असं काम करणाच्या व्यक्तींना अगर कंपन्यांना साहाय्य करणं असं या व्यवसायाचं स्वरूप आहे. ज्यांना आपल्या विषयाचं सखोल व 'प्रॅॅक्टीकल' आहे व समाजाबरोबर सुसंवाद साधण्याचे कौशल्य ज्यांच्याजवळ आहेे. त्यांच्यासाठी मार्ग उत्तम आहे. मात्र ,आपण या विषयात ज्ञानी असून योग्य सल्ला देऊ शकता अशी आपली 'इमेज' समाजात असणं आवश्यक आहे. ही इमेज बनविण्यासाठी साधारण पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो.
शिक्षण किंवा प्रशिक्षण:
 आज कोणत्याही क्षेत्रात तंत्रज्ञानाला असाधारण महत्त्व प्राप्त झाल्याने त्याचं प्रशिक्षण ही आवश्यक बाब आहे. तेव्हा नोकरी सुटल्यानंतर आपल्याला असणारं ज्ञान दुसर्याला देणे, त्याला प्रशिक्षित करणे हा व्यवसाय भरभराटीचा ठरू शकतो. तथापि, त्यासाठी नुसतं ज्ञान असून चालत नाही, तर शिकवण्याची कला अवगत असण आवश्यक आहे. ही हातोटी आपण काही वर्षांच्या सरावाने साध्य करू शकता. हा व्यवसाय नोकरीला पर्याय म्हणून लोकप्रिय ठरला आहे.
लेखन:
 आपल्याला माहिती असणाऱ्या विषयांवर वृत्तपत्रे, नियतकालिकं अथवा पुुस्तकांच्या माध्यमातून लेखन करणे हा चांगला पर्याय होऊ शकतो. यासाठी त्या माध्यमाशी अनुरूप अशी लेखनशैली कमवावी लागते. काही जणांना ती उपजत असते, तर काही जण त्यात सरावाने तरबेज होतात. माझ्या माहितीचे ‘प्रॉक्टर अँड गैम्बल' कंपनीचे माजी संचालक गुरुचरण दास यांनी स्वेच्छानिवृत्तीनंतर वृत्तपत्रांतून लेखन सुरू केलं. आज त्यांचा उत्कृष्ट स्तंभलेखक म्हणून नावलौकिक आहे.याखेरीज चित्रकला, गायन, संगीतरचना, फोटोग्राफी संगणकीय ग्राफिक्स, वक्तृत्त्व, अभिनय आदी कलांची जोपासनाही उपयोगी पडू शकतेे. पब्लिक कॉल ऑफिस, ई-मेल सेवा, कुरिअर सेवा, संगणक आधारित सेवा, आदि व्यवसायदेखील सुरू करता येतात. त्यात फार गुंतवणूक लागत नाही.

तात्पर्य:
 करिअरमध्ये केव्हाही बदल करावा लागू शकतो याची जाणीव करिअर चालु असतानाच ठेवणे व पर्यायी व्यवस्थेची तयारी करणे हे आता गरजेचे झालं आहे.नव्या जगाची ती सर्वप्रथम मागणी आहे.तेव्हा असुरक्षिततेला घाबरून न जाता तिचं सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन करण्याची निकड आहे.संकटाचं संधीत रूपांतर करण यासारखा आनंद दुसरा नाही.

संकटाचे संघीत रुपांतर करा/३८