पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/४०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.बेंगलोरला एका बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीत पन्नास हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली. त्याच्या कामाचा झपाटा व गुणवत्ता पाहून वर्षभरात पदोन्नती देण्यात येऊन त्याचा पगारही जवळजवळ दुप्पट झाला.
 सर्व काही मनासारखं घडत होतं. त्यामुळे त्याने लहानपणापासून रंगविलेली स्वप्नं साकारण्यास सुरुवात केली. कोणत्याही मध्यमवर्गीयाचं सर्वात आवडतं स्वप्न म्हणजे स्वतःचं घर व कार! सुधीरही त्यास अपवाद नव्हता. त्यामुळे त्याने बँकेकडून कर्ज घेऊन तीन वर्षांपूर्वी महागडी कार व पॉश फ्लॅट घेतला. दर महिन्याला बरीच रक्कम कर्जफेडीच्या हफ्त्यांपोटी भरावी लागत असली, तरी त्याचा पगारही मोठा असल्नेया काही अडचण नव्हती.
 उत्पन्न वाढल्याने आता त्याचे व त्याच्या कुटुंबाचे इतर खर्चही वाढू लागले होते. लहानपणापासून अनुभवलेल्या मध्यमवर्गीय जीवनशैलीचे रूपांतर अवघ्या चार वर्षांमध्ये श्रीमंती थाटात झालं होतं. पण सदासर्वकाळ सुख कुणाच्या वाट्याला येत नसतं. गेली दहा वर्षे दर वर्षी १०० टक्के वाढ होणाऱ्या आय.टी. उद्योगात गेल्या दोन वर्षांपासून मंदीची लाट आली होती. हा उद्योग कमी गुंतवणुकीचा पण प्रचंड फायद्याचा असल्याने गेल्या सात-आठ वर्षांत त्यात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक झाली होती. असंख्य कंपन्या स्थापन झाल्या होत्या. त्यामुळे गळेकापू स्पर्धा निर्माण होऊन फायद्याचे प्रमाण कमी होऊ लागलं. फायद्यातल्या कंपन्याही तोट्यात जाऊ लागल्या. आय.टी.चा फुगा फुटणार असं वातावरण निर्माण झालं. कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळू लागले. गुंतवणूकदारांचा या क्षेत्रातील रस संपला.
 कंपनी तोट्यात जाऊ लागली की, पहिली कुऱ्हाड कर्मचाऱ्यांवर कोसळते. सुधीरच्याही कंपनीची अवस्था अशीच बिकट झाली होती. त्यामुळे कर्मचारी कपात अटळ होती. त्याच्या कार्यालयातील २० टक्के स्टाफ कमी करण्यात आला. लवकर मार्केट सुधारलं नाही तर ५० टक्के कर्मचारी कमी करावे लागतील, कदाचित कंपनीची ही शाखा बंदही करावी लागेल असे संकेत मिळू लागले.
 सुधीरचं करिअर उत्कृष्ट, शिवाय गेल्या सहा वर्षात त्याने आपली सर्व बुध्दिमत्ता व कार्यशक्ती पणाला लावून कंपनीचा फायदा करून दिला होता. कंपनी त्याला जो मोबदला देत होती, त्यामुळे पहिल्या तडाख्यातून तो वाचला होता, पण ही घसरगुंडी त्वरित रोखली गेली नाही तर, तर आपलंही काही खरं नाही, हे तो जाणून होता. लहानपणी शाळेतल्या गुरुजींकडून ऐकलेली 'बिरबल व माकडणीची’ कथा त्याला आठवली.

 नेमके हेच त्याचं व त्याच्या कुटुंबीयांच्या चिंतेचं कारण होतं. नोकरी गेली तर पुढे

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/३१