पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काय, दुसरी नोकरी मिळू शकेल, पण पगार आतासारखा मिळेल का? समजा, खूप कमी पगाराची नोकरी पत्करावी लागली तर आताचं उच्च राहणीमान कसं निभेल? क्लब, पार्ट्या बंद करून तो खर्च वाचविता येईल. (कारण लहानपणी आईवडिलांनी लावलेली काटकसरीची सवय सुटलेली होती, पण विसरलेली नव्हती.) पण घर व कारच्या हप्त्यांचं काय? स्वतःचा व्यवसाय सुरू करावा म्हटलं तर, भांडवलाचा प्रश्न आहे. शिवाय या मंदीच्या काळात नवा व्यवसाय लवकर मूळ धरेल का, हे यक्षप्रश्न तर होतेच. शिवाय नोकरी गमावलेल्या माणसाकडे समाज एकतर कुचेष्टेच्या किंवा दयेच्या नजरेने पाहतो. कोणत्याही स्वाभिमानी माणसाला या दोन्ही नजरा सहन होत नाहीत, तेव्हा या स्थितीला कसं तोंड द्यावं, अशा अनेक विचारांचं काहूर त्याच्या डोक्यात उठतं. आपला धीर सुटतो की काय असं त्याला राहून राहून वाटत असतं.
 असे अनेक धीर सुटलेले सुधीर आज दिसून येतात केवळ आय.टी. नव्हे तर सर्वच उद्योगांमध्ये जगभरात उसळलेल्या मंदीच्या लाटेने अनेक कर्मचाऱ्यांच्यावर नोकरी गमावण्याची पाळी आलेली आहे. अशी वेळ आलीच तर स्वत:ला सावरायचं कसं आणि हे आव्हान स्वीकारायचं कसं, याबाबत प्रथमपासून सर्वंकष नियोजन करणंं आवश्यक आहे.
 थोडक्यात, करिअर ऐन भरात आली असताना अचानक त्यात बदल करण्याची पाळी आली,तर परिस्थिती कशी हाताळायची, म्हणजेच या बदलाचं 'व्यवस्थापन' कसं करावयाचं याचा विचार आपण या लेखात करणार आहोत. मी वर दिलेली कथा ही या लेखाची ‘थीम' आहे.
 करिअरमध्ये अचानक कराव्या लागणाऱ्या बदलांचंं व्यवस्थापन कसं करावंं हे पाहण्यापूर्वी व्यवसाय, नोकरी व करिअर या संकल्पना व त्यांचा विकास यांचा इतिहास नजरेखालून घालणं मनोरंजक ठरेल. कारण सध्याच्या समस्यांचं मूळ या इतिहासात आहे.
 सुमारे १० हजार वर्षांपूर्वी मानवाला शेती व पशुपालन तंत्रज्ञानाचा शोध लागला. तेव्हापासून मानवजातीचा आर्थिक विकास सुरू झाला. त्यामुळे मानवाची विभागणी दर व्यवसायांमध्ये (व्होकेशन) झाली.
 १. मालक - ज्याच्या हातात उत्पादन साधनेे आहेत.
 २. नोकर - जो मालकाला उत्पादन प्रक्रियेत मदत करतो.

 यापैकी मालक हा व्यवसाय साहजिकच अधिक प्रतिष्ठेचा होताा. पण निसर्गाच्या लहरीमुळे होणारं नुकसान सहन करावयाचा त्यामुळे धोका पत्करण्याची तयारी हा मालक बनण्यासाठी आवश्यक गुण होता. अर्थात व्यावसायिक फायद्यामुळे मिळणारी सुुखं व समृध्दीही तो उपभोगू शके.

या संकटावर मात कशी करणार/३२