पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वीकारा, नाही तर मी राजीनामा देतो’, असं सांगणारा अध्यक्ष त्यांना आजच भेटला होता.

 “हे पाहा, सहा महिन्यांत उत्पादन दुप्पट करा, हे मी आपल्याला म्हटलं होतं खरं, पण इतकी गडबड करण्याचं कारण नाही.आपण जरा दमानं घेऊ या. राजीनाम्याची भाषा कशाला?’ मंत्र्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये टोलवाटोलवी सुरू केली.

 “साहेब प्रकल्पाला अध्यक्षाची नव्हे, परदेशी सुटया भागांची आवश्यकता आहे. शिवाय आपल्याला गडबड नसली, तरी मला आहे कारण मी शब्दांचा पक्का आहे."

 काही सांगितलं तरी जनरल साहेब बधत नाहीत,याची जाणीव मंत्र्यांना झाली. मागण्या मान्य करण्यावाचून त्यांच्यासमोर दुसरा पर्याय राहिला नाही.कारण भगत यांनी खरोखरच राजीनामा दिला असता, तर ते मोठं प्रकरण झालं असतं. त्याला वृत्तपत्रीय प्रसिध्दी मिळाली असती आणि सरकारची प्रतिष्ठा धोक्यात आली असती.

 अखेरीस हो ना करता करता वीजमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांशी संपर्क साधून काही दिवसांत भगत यांच्या मागण्या मान्य केल्या. एकंदर साडेचार कोटी रुपयांचे सुटे भाग आयात करण्याचं फर्मान सुटलं.

 सरकारी यंत्रणा धडाधड कामाला लागली. परदेशी कंपन्यांना आवश्यक त्या सुट्या भागांचा पुरवठा करण्याची ‘ऑर्डर’ देण्यात आली आणि एक चमत्कार घडला. इतके दिवस आजारी असणारा दामोदर व्हॅली प्रकल्प एकदम खडखडीत बरा झाला.चांगला धावू लागला आणि खरोखरंच सहा महिन्यांत वीज उत्पादन दुप्पट झालं.

 आता आपण विचाराल, यात चमत्कार कोणता? तर चमत्कार असा झाला होता की,परदेशांत सुट्या भागांची ऑर्डर देण्यात आली होती, तरी प्रत्यक्षात एकही सुटा भाग भारतात आला नव्हता. परदेशी सुट्या भागांशिवायच, केवळ देशी सुटे भाग वापरून उत्पादन दुप्पट झालं होतं.

हा अभूतपूर्व प्रकार घडला तरी कसा? तर त्याचं असं झालं होतं की,जनरल भगत मंत्र्यांपर्यंत पोचले, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राजीनामा देण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला आणि सरकारला वाकवलं, ही बातमी प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोचली होती. प्रकल्प व त्याचे कर्मचारी यांच्या हितासाठी वेळप्रसंगी सर्वोच्च पदाचा त्याग करण्याची तयारी असणारा अध्यक्ष त्यांना प्रथमच मिळाला होता. भगत यांंच्या निग्रही व त्यागी मनोवृत्तीचा योग्य तो परिणाम कर्मचाऱ्यांवर झाला. आपल्या व प्रकल्पाच्या भल्याचा इतक्या आपुलकीने विचार करणाऱ्या अध्यक्षाचा शब्द खोटा ठरता कामा नये,या भावनेने त्यांना झपाटून टाकलं. भगत यांनी आपल्या कृतीतून कर्मचाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला होता.या विश्वासातून आपणही प्रकल्पासाठी काहीतरी करून

एक व्यवस्थापकीय चमत्कार/२८