पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्हॅली काॅपोरेशन हा 'आजारी प्रकल्प' यांच्या गळ्यात मारण्यात आला होता.‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली...’ असा सूज्ञ (की क्षुद्र) राजकीय विचार त्यापाठी होता, अशी त्या काळी चर्चा होती.
 एकेकाळी ‘भारताला मिळालेले वैज्ञानिक वरदान' म्हणून ओळखल्या गेलेल्या दामोदर व्हॅली प्रकल्पाची त्यावेळी (१९७३ मध्ये) अत्यंत वाईट अवस्था होती. वीज उत्पादन दिवसेंदिवस घटून अर्ध्यावर आलं होतं.‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ अशी स्थिती होती.उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होता. प्रकल्पाची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेकदा त्याचे अध्यक्ष बदलण्यात आले होते, पण काही फरक पडत नव्हता. प्रकल्पाची धुरा जनरल भगत यांच्या हाती सोपविताना त्यावेळच्या वीजमंत्र्यांनी या सर्वांची कल्पना दिली होती.तथापि, ‘सहा महिन्यांत उत्पादन दुप्पट करा' अशी आदेशवजा विनंती करण्यासही मंत्रिमहोदय विसरले नव्हते.
 कर्तव्यतत्परतेत आयुष्य घालविलेल्या भगत यांनी क्षणाचाही विचार न करता ही अशक्यप्राय वाटणारी जबाबदारी स्वीकारली आणि प्रकल्प अभियंत्यांच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी उत्पादन वाढविण्याचंं आवाहन केलं.
 'हे अशक्य आहे’ असे मत अभियंत्यांनी एकमुखाने व्यक्त केलं. 'प्रकल्पाची यंत्रसामुग्री आता जुनी झाली आहे. चीनबरोबरच्या युध्दानंतर प्रकल्पाची आर्थिक मदत कमी करण्यात आली आहे. यंत्रसामुग्रीचे सुटे भाग परदेशांतून आयात करावे लागणार आहेत, पण त्यासाठी पैसा नाही. खेरीज आयातीचा परवानाही मिळत नाही. देशात तयार झालेले सुटे भाग वापरले, तर ते चांगले चालत नाहीतच, शिवाय यंत्रातील इतर चांगले भागही त्यांच्यामुळे खराब होतात. अशा परिस्थितीत सहा महिन्यांत उत्पादन दुप्पट होणंं तर सोडाच, उलट ते कमी कमीच होत जाणार आहे',अशा अनेक तक्रारी अभियंत्यांनी सांगितल्या.
 "आपल्याला कोणकोणते सुटे भाग आयात करण्याची आवश्यकता आहे, याची यादी मला द्या, ते मिळविण्याची जबाबदारी मी स्वीकारतो." जनरल भगत म्हणाले.
 यादी व मागणीपत्र घेऊन ते वीजमंत्र्यांना भेटले. पण त्यांनी नुसतेच मागणीपत्र नेले नव्हते, तर एका हातात मागणीपत्र व दुसऱ्या हातात राजीनामापत्र घेऊन ते मंत्र्यांकडे गेले होते.
 यापैकी कोणतेही एक स्वीकारा' अशी विनंती त्यांनी दोन्ही कागद समोर ठेवून त्यांनी मंत्र्यांना केली.

 मंत्रिमहोदय चमकले. आयातीचा परवाना व आर्थिक मदत मागण्यासाठी या प्रकल्पाचे अध्यक्ष आजपर्यंत त्यांच्याकडे आले होते. मात्र, ‘प्रकल्पाच्या मागण्या

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/२७