पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/३८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


दाखविण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांमध्ये उत्पन्न झाला.या निर्धारातून प्रयत्नास सुरुवात झाली.परदेशांतून सुटे भाग येण्याची वाट न पाहता,देशी भागांमध्येच योग्य ते बदल करून कर्मचाऱ्यांनी प्रकल्पाची जनित्रं सुरू केली.जे देशी सुटे भाग उपयोगी पडणार नाहीत असं पूर्वी वाटत होतं, त्यांचा खुबीने उपयोग केल्यास ते वापरता येऊ शकतात हे त्यांच्या लक्षात आलं.
 या प्रयत्नांमधून थोड्याच कालावधीत अपेक्षित यश मिळू लागलं. सहा महिन्यात कोणत्याही परदेशी तंत्रज्ञानाशिवाय वीज उत्पादन दुप्पट झालं.‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ ही संत तुकारामांची उक्ती या कर्मचाऱ्यांनी अक्षरश: खरी करून दाखविली.
 काही जण या कथेला ‘दंतकथा' ही समजतात. काहीही असलं तरी ती इतक्या सविस्तरपणे सांगण्याचे कारण असं की, यात व्यवस्थापनशास्त्राचं एक मूलभूत तत्त्व दडलं आहे. ते कोणतं? तर, जेव्हा व्यवस्थापकावर एखादं काम सोपविण्यात येतं,तेव्हा त्याच्या मनात दोन प्रश्न उपस्थित होतात.
 १. हे कशासाठी करायचं? (व्हाय डू इट)
 २. हे का करून दाखवू नये? (व्हाय नॉट डू इट)
 यापैकी पहिला प्रश्न जर व्यवस्थापकाच्या मनात मूळ धरून बसला तर त्याला हे काम करणं अशक्य होतं, याची अनेक कारणं सापडतील. मात्र त्याने दुसऱ्याच प्रश्नाला महत्त्व दिलं तर ते काम करण्याच्या अनेक मार्गांचा त्याला शोध लागेल.
 जनरल भगत यांनी दामोदर प्रकल्पाचं अध्यक्षस्थान स्वीकारण्यापूर्वी तेथील कर्मचाऱ्यांच्या मनात पहिला प्रश्न घर करून होता. त्यामुळे प्रकल्पाची दुर्दशा झाली होती. मात्र, भगत यांनी आपल्या वर्तणुकीद्वारा पहिल्या प्रश्नाचं रूपांतर दुसऱ्या प्रश्नात केलं आणि प्रकल्प यशस्वी करण्याचा मार्ग कर्मचाऱ्यांना सापडला.

 व्यवस्थापकाने त्याच्या कर्तव्यनिष्ठ, कणखर, निग्रही पण सहृदय वृत्तीतून कर्मचाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला की, विश्वासातून निर्धार, निर्धारातून प्रयत्न व प्रयत्नांतून यश अशी साखळी सुरू होते. हेच व्यवस्थापनातील मूलभूत तत्त्व होय.अशी साखळी प्रक्रिया सुरू करणं ही केवळ उद्योग क्षेत्रातीलच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांतील व्यवस्थापकांची जबाबदारी आहे.

अद्भुतदुनिया व्यवस्थापनाची / २९