पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्हायचा आणि तो उद्या आपल्या साम्राज्यात हिस्सा मागायचा!
 यानंतर सुमारे पावणे-दोनशे वर्षांनी आपल्याकडे औरंगजेबानेही याच घटनेचा ‘अॅक्शन रिप्ले’ करून दाखवला होता.
 या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की, संपत्ती आणि तिची वाटणी यामुळे ओढवणारा अनर्थ कोणती सीमा गाठू शकतो.
 या समस्येवर काही उपाय शोधण्याचाही प्रयत्न झाला होता. सर्वात मोठ्या मुलाने कुटुंबाचा ‘कर्ता’ व्हायचं आणि बाकीच्या भावांनी त्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं ही पध्दत त्यातूनच रूढ झाली, पण कर्त्याच्या अधिकाराला आव्हान देणारे धाकटे भाऊही असायचे. अखेरीस भांडणाला वैतागून कुटुंबाच्या मालमत्तेची वाटणी करणं व सर्व भावांनी आपापल्या हिश्श्याचे मालक बनणं, हा सर्वमान्य उपाय शोधण्यात आला. यामुळे घराण्यातील भांडणं व त्यातून वेळप्रसंगी होणारा हिंसाचार याला आळा बसत असे, पण घराण्याची प्रतिष्ठा, समाजात असणारे वजन, घराण्याची थोरवी आणि आर्थिक ताकद कमजोर होत असे.
 इतिहासकाळी एखादं साम्राज्य किंवा घराणं यांचा विस्तार जसजसा वाढत असे, तशी त्याचा कारभार पाहण्यासाठी राजघराणं किंवा कुटुंबातील माणसे कमी पडत. मग घराण्याच्या बाहेरच्या व्यक्तींना मोबदला देऊन घराण्याची मालमत्ता, उद्योग, व्यवसाय व संपत्ती यांच्या देखभालीसाठी नेमलं जाऊ लागलं. यातूनच नोकरशाही, ज्याचं गोंडस नाव प्रशासन आहे, तिचा जन्म झाला. या बाहेरच्या व्यक्तींना म्हणजेच नोकरदारांना त्यांच्या मगदुराप्रमाणे व पात्रतेनुसार निरनिराळी कामे सोपविली जात. त्यांना ती राजा किंवा मालक यांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे पार पाडावी लागत.
नोकरदारांची निवड:
 एखादा उद्योग, व्यवसाय, संस्था किंवा शासन यांचा कारभार पाहण्यासाठी लागणाऱ्या नोकरदारांची निवड पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत मुख्यत्वे दोन कसोट्यांवर केली जाते. पहिली कसोटी म्हणजे पात्रता तर दुसरी इमान. राज्यकारभारांचे विविध विभाग सांभाळण्यासाठी योग्य व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची निवड स्पर्धात्मक चाचणी परीक्षेद्वारा घेण्याची पध्दत प्राचीन चीनमध्ये अस्तित्वात होती. तिचं अनुकरण नंतर अनेक राज्यांनी केलं.

 ओटोमान साम्राज्यात यासाठी वेगळीच पध्दत उपयोगात आणली जात असे. तिचं नाव ‘कापी कुल्लारी’ असं होतं. त्यानुसार खिश्चन पण नंतर इस्लाम धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींची निवड निरनिराळे प्रशासकीय विभाग सांभाळण्यासाठी करण्यात येत असे. या व्यक्तींना मोठे अधिकार जरी देण्यात येत असले तरी सुलतानाचे ते गुलामच असत.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२३