पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२७३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


उदाहरणांवरून दिसून येईल.
 भारतीय नीतिमूल्यांसंबंधी बरंच काही बोललं - लिहिलं जातं. ही नीतिमूल्यं अध्यात्माच्या पवित्र पायावर आधारित आहेत. पाश्चिमात्यांसारखी पैसा आणि भौतिक सुखावर अवलंबून नाहीत असं सांगितलं जातं. ते सिध्द करण्यासाठी पुराण काळातील ग्रंथ व घटनांचे दाखले दिले जातात.तथापि, हे सर्व लिखाण व्याख्यानांपुरतेच मर्यादित राहते. व्यवहारात कोणत्याही कृतीचा पाया ‘स्वार्थ’ हाच असतो.
 आपली नीतिमूल्यं घडविणारे तीन स्रोत असतात. एक, बालपणी पालकांनी केलेले संस्कार. दोन, जाणत्या वयात आल्यानंतर आपण स्वतः केलेली निरीक्षणं व तीन, स्वतःची अंतःप्रेरणा.
 बालपणी आपल्याला ‘चांगलं ’ आणि ‘वाईट’ यातील फरक समजावून दिला जातो. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी घडविल्या जातात. वडिलधाऱ्या मंडळींचा आदर करणं शिकवलं जातं. हे संस्कार पालक, आजोबा-आजी, कुटुंबातील इतर वयस्कर, नातेवाईक, शेजारी, शिक्षक इत्यादीकडून केले जातात.
 आपण जाणत्या वयाचे होतो, तेव्हा बालपणीच्या या संस्कारांना आपल्या अनुभवांची व निरीक्षणांची जोड मिळते. त्यामुळे काही संस्कारांना तडे जातात, तर काही संस्कार आणखीनच पक्के होतात. जे ऐकलेलं असतं, त्यापेक्षा जे पाहतो त्यावर आपण जास्त विश्वासू ठेवू लागतो. बालपणीचे संस्कार व मोठेपणीचे अनुभव यांच्या संयोगातून आपली नीतिमूल्यं ठरतात.
 तिसरा स्रोत अंत:प्रेरणेचा आहे. प्रत्येकाला स्वतंत्र बुध्दी निसर्गाकडून मिळालेली असते. तिचा वापर करून तो स्वतःचे विचार घडवतो आणि त्याप्रमाणे वागतो. आपल्याला अनेकदा एकाच घरातील दोन पिढ्या किंवा एकाच पिढीतील दोन व्यक्ती पूर्णत: भिन्न व परस्परविरोधी आचार-विचारांच्या आढळतात. याचं हेच कारण आहे.
 चिनी तत्त्ववेत्ता कन्फ्युशियसच्या म्हणण्यानुसार ‘परिस्थितीचे आकलन, सकारात्मक किंवा नकारात्मक विश्लेषण आणि विरोध सहन करण्याची ताकद यातून व्यक्तीची नीतिमूल्ये बनत जातात.
 सध्याच्या काळात ‘समानता’ हे महत्त्वाचं नीतिमूल्य आहे. सर्व माणसं सारखीच असून समान संधीचे हक्कदार आहेत. ही पाश्चात्य संकल्पना आहे.यात लिंग, भाषा,जात, धर्म, समाज, इतकंच नव्हे तर देश किंवा राज्य यावर आधारित भेदाभेदही मानला जात नाही. याबाबत अमेरिकेत घडलेली एक घटना समजून घेणं मनोरंजक ठरेल.

 व्हील चेअरवरील वृध्द व अपंगांना कुणाच्या मदतीशिवाय हालचाल करणे शक्य व्हावे म्हणून सर्व इमारतींना रॅम्प असावेत, असा प्रस्ताव अमेरिकेतील एका राज्याच्या

भारतीय नीतिमूल्ये : समज -गैरसमज /२६५