पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शकतो? या प्रश्नाचंं उत्तर इतरांसमवेत असं असलं तर दुसरा प्रश्न विचारला पाहिजे की, माझ्यासमवेत काम करणाऱ्या इतरांबरोबर कसे संबंध ठेवणंं मला आवडतं? काही लोक टीम-मेंबर्स म्हणून चांगलं काम करू शकतात. काही लोक दुय्यम सहकारी (सबॉर्डिनेट्स) म्हणून उत्तम असतात, तर काही जण एकट्याने चांगली कामगिरी करतात. काही जण मार्गदर्शक किंवा नेते म्हणून चमकू शकतात. हे सर्व गुण एकाच व्यक्तीत असणंं शक्य नसतं. त्यामुळंं वरीलपैकी कोणत्या श्रेणीत आपण बसतो हे प्रत्येकानं तपासून पाहून मग आपली जबाबदारी निश्चित केली पाहिजे.
 यापुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, तुम्ही निर्णय घेणारी व्यक्ती (डिसिजन मेकर) म्हणून चांगले आहात की, सल्लागार म्हणून? कारण कित्येकांना निर्णय घेण्यापूर्वी किंवा धोरण ठरविण्यापूर्वी कुणाचा तरी सल्ला घेण्याची आवश्यकता भासते. असा सल्ला मिळाल्यानंतर त्यांची विचारशक्ती, आत्मविश्वास आणि साहस जागृत होते आणि ते झपाट्याने निर्णय घेतात. निर्णय घेणाऱ्या व्यक्तीवर कार्याच्या यशापयशाची पूर्ण जबाबदारी असते. सल्लागाराचं तसं नसतं. म्हणून कोणत्याही संस्थेत सर्वात वरची जागा निर्णय घेण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीला दिली जाते. नंतर अशी व्यक्ती आपल्या विश्वासातील कुणा निष्णात सल्लागाराला आपला मदतनीस म्हणून क्रमांक दोनच्या स्थानावर नियुक्त करते.
 क्रिकेट सामन्यात आपण बऱ्याचदा पाहतो की, काही खेळाडू संघ अडचणीत असताना चांगली कामगिरी करतात. संघ सुस्थितीत असताना ते काहीसे रिलॅक्सड् असतात, तर काही खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी पोषक वातावरणच लागतं. इतर क्षेत्रांतही असं असतं. काहीजणांची कामगिरी तणावाखालीच खुलते, तर काही जणांना वातावरण अगदी अनुकूल लागतं. मी अनेक असे कर्मचारी पाहिलेत की, जे मोठ्या संस्थांमध्ये उत्कृष्ट काम करून दाखवितात, पण छोट्या संस्थांमध्ये त्यांची कामगिरी ढेपाळते. कित्येकांच्या बाबतीत याच्या उलट प्रकारही घडतो. तेव्हा आपण कोणत्या प्रकारात मोडतो याची खूणगाठ ज्याची त्यानंं बांधली पाहिजे आणि यावरून कार्यक्षेत्र निवडलं पाहिजे.

 तात्पर्य काय, तर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात बदल करण्याच्या फंदात फारसे पडू नये. त्यात यश येण्याची शक्यता कमी आहे. त्यापेक्षा कार्यपध्दती सुधारण्यासाठी झटा. जे काम आपल्याला जमणार नाही किंवा चांगलं जमणार नाही असं वाटतं ते शक्यतो अंगावर घेऊ नका.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/१८१