पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कृतिशीलता (सेन्स ऑफ अॅक्शन)
विश्वासूपणा (सेन्स ऑफ लॉयल्टी).

ध्येयनिष्ठा : प्रत्येक संस्थेची निश्चित ध्येये असतात. त्यांची पूर्तता करणं हे संस्थेच्या प्रत्येक व्यवस्थापकाचं आद्य कर्तव्य आहे. यासाठी कुरियन यांच्याप्रमाणं निःस्वार्थ मनोवृत्तीनं कार्य करणं आवश्यक आहे. आणंद इथल्या शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी त्यांनी दिल्लीतील राजेशाही पद न स्वीकारण्याचा निर्धार दाखविला.

 संस्थेच्या ध्येयांची पूर्ती करण्यासाठी ती नेमकी कोणती आहेत, हे समजून घेणं आवश्यक असतं. कुरियन यांना एकानं विचारले, ‘अमूल'चं ध्येय कोणतं? ते म्हणाले, केवळ दूध व दुधाचे पदार्थ उत्पादन हे आमचं साध्य नाही. ते केवळ एक साधन आहे. त्याचा उपयोग करून गरीब शेतकच्यांचं आर्थिक उत्थान करणं हे मूळ ध्येय आहे. म्हणजेच व्यवस्थापकानं संस्थेची ध्येयधोरणं आणि उद्दिष्ट यांचा वरवर पाठपुरावा करून भागत नाही, तर त्या ध्येयापाठीमागचं ध्येय कोणतं याचा शोध घेऊन त्याची जाणीवपूर्वक पाठराखण करावी लागते. यालाच ध्येयनिष्ठा म्हणतात.

कृतिशीलता : योग्य वेळी अचूक कृती करणं हा यशस्वी व्यवस्थापकाचा एक महत्वाचा गुणधर्म आहे. याखेरीज ध्येयपूर्ती योग्य पध्दतीनं होत नाही. याचं उदाहरण कुरियन म्हणतात, शेतकऱ्याची म्हैस विण्याच्या परिस्थितीला आलेली असते. पण वीत सुरळीत होत नाही. रेडकू आडवं आलेलं असतं. खेड्यांमधून हे नेहमीच घडतं. अशा वेळी त्वरित पशुवैद्यकीय मदत मिळाली नाही तर म्हैस मरण्याची शक्यता असते. म्हैस मरणं म्हणजे शेतकरी व आमची संस्था अशा दोघांचंही नुकसान म्हणजेच ध्येयपूर्तीच्या मार्गात अडथळा. तो उद्भवू नये म्हणून आम्ही खेडोपाडी रेडिओ टेलिफोन सेट्स वितरित केले आहेत. त्यावरून संदेश मिळाला की, त्वरित मदत पोहचविली जाते. याचा अर्थ असा की, संभाव्य अडचणींचा व अडथळ्यांचा अगोदरच अंदाज घेऊन खबरदारीची उपाययोजना करून ठेवणं व्यवस्थापकाचं कर्तव्य आहे. त्यामुळं योग्य वेळी योग्य कृती करणं सोपं जातं.

विश्वासूपणा :

 कुरियन यांची शेतकरीनिष्ठा कौतुकास्पद होती. ते म्हणत, ‘शेतकरी मूर्ख नाही. परंपरेनं चालत आलेलं ज्ञान त्याच्यापाशी खूप आहे. आपल्या मालाला सुनिश्चित बाजारपेठ आहे, अशी त्याची खात्री पटली की, तो अधिकाधिक उत्पादन करतो.’ या प्रवृत्तीमुळं शेतकऱ्यांच्या विश्वास त्यांनी कमावला. ‘अमूल’ मटकावू पाहणारे राजकारणी आणि नोकरशहा यांच्याशी सामना करण्याचं बळ त्यांना शेतकऱ्यांच्या पाठबळामुळं प्राप्त झालं. त्यामुळंच ‘अमूल'चा ध्वज आजही दिमाखात आणि डौलानं फडकत राहिला आहे.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/१५९