पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१६७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


असूनही आपण आणंदचा कायापालट केलात. हे कसं शक्य झालं मी समजू शकलो नाही."
 डॉ. कुरियन उत्तरले, “उर्वरित भारत आणि आणंद यांच्यातील सर्व साम्य स्थळं आपण अचूक हेरलीत,पण एक महत्त्वाचा फरक आपल्या नजरेतून निसटला आणि या फरकातच आपल्या शंकेचं समाधान दडलं आहे. इथला हा अमूल उद्योग शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. तिचं व्यवस्थापन शेतकऱ्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सांभाळतात. त्यांनी आपला उद्योग चालविण्यासाठी माझी निवड केली आहे. मी सरकारनियुक्त अधिकारी नव्हे, मला शेतकऱ्यांनी नेमलं आहे. मी त्यांचं समाधान केलं नाही तर मला माझं काम गमवावं लागेल. बदली करून घेण्याचा पर्यायही माझ्यासमोर नाही. मला सरळ घरीच बसावं लागेल. या दुग्धशालेचा प्रशासकीय व्यवस्थापक या नात्यानं शेतकऱ्यांचा विश्वास कमावण्याची आणि तो टिकविण्याची जबाबदारी माझी आहे. येथील शेतकऱ्यांची उपजीविका या दुग्धशालेला दूध पुरवून चालते. त्यामळं त्यांनी अधिकाधिक दूध उत्पादन करावं ही जबाबदारी मला स्वीकारावी लागते. ते माझ्याकडं येतात आणि म्हणतात, ‘माझी म्हैस दोन लिटर दूध देते, ती तीन लिटर कशी देईल ते सांगा.' यातून प्रेरणा घेऊन आम्ही हा पशुखाद्य कारखाना काढला. कारण जनावरांना चांगला खुराक मिळाला तर ती अधिक दूध देतील. याखेरीज म्हशींच्या कृत्रिम गर्भधारणेसाठी लागणारं तंत्रज्ञान, आणि दूध उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या इतर सर्व सेवा इथं शेतकऱ्यांनी नियुक्त केलेले कर्मचारीच पुरवितात. सरकारी कर्मचारी नव्हेत. त्यामुळं हा उद्योग शेतकऱ्यांशी एकनिष्ठ आहे. त्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील आहे. त्यांच्या मागण्यांना त्वरित प्रतिसाद देण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळेचं आणंद आज न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड येथील दुग्धशालांच्या तोडीस तोड कामगिरी करीत आहे. असं भारतात इतरत्र दिसतं का?"
 आता मात्र शास्त्रीजी खरंच निरुतर झाले. त्यांनी कुरियन यांना राष्ट्रीय दुग्धशाला विकास महामंडळाचं अध्यक्षपद देऊ केलं. त्यांनी पद स्वीकारण्याची तयारीही दर्शिवली, पण दोन अटी घातल्या. एक आपण सरकारकडून मानधन स्वीकारणार नाही, पण शेतकऱ्यांनी नियुक्त केलेले व्यवस्थापक म्हणून कार्यरत राहू. दोन, महामंडळाचे मुख्यालय आणंद इथे असलं पाहिजे. दिल्लीत नाही. ते पुढे म्हणाले, “दिल्लीतील लोक इतर बऱ्याच गोष्टींंचा विचार करतात, पण शेतकऱ्यांचा विचार करावयाला त्यांना वेळ मिळत नाही. आणंदमध्ये आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतो, इतर गोष्टींचा नाही. त्यामुळं मी आणंद सोडणार नाही. तुम्हाला माझी सेवा हवी असेल तर महामंडळ येथे येऊ द्या."

 आपल्या कर्तव्याला वाहून घेतलेल्या व्यवस्थापकाचे गुणधर्म कोणते असले पाहिजेत, हे कुरियन यांच्या उत्तरावरून आपल्याला समजून येईल. ते गुणधर्म म्हणजे, ध्येयनिष्ठा (सेन्स ऑफ मिशन)

व्यवस्थापकचे गुणधर्म/१५८