पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१६५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आहेत. अस्सल भारतीय उद्योगांची पिछेहाट थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत.
 बहुराष्ट्रीय कंपन्यांवर बंदी घालणंं हा यावर उपाय होऊ शकेल का? माझ्या मते नाही. आपल्याला धर्मांतर रोखावयाचंं असेल तर धर्मांतरावर बंदी घालणं हा दूरवरचा उपाय झाला. त्रुटी आणि कमतरता दूर करून स्वतःचा धर्म बळकट करणं आणि तो सोडून जाण्याची इच्छा कुणाला होऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणंं हा त्यावरील कायमस्वरूपी उपाय आहेे.
 त्याचप्रमाणे बहुराष्ट्रीय कंपन्यांशी यशस्वी सामना करावयाचा असेल तर, त्यांच्यावर बंदी घालून फारसा उपयोग होणार नाही, तर आपल्या व्यवस्थापन शैलीत योग्य ते बदल घडवून ती पाश्चात्यांच्या तोडीस तोड बनविणंं, आपल्या मालाचा दर्जा सुधारणं आणि यासाठी पाश्चात्य व्यवस्थापन पध्दतीतील उपयुक्त बाबींचा निःसंकोच स्वीकार करणं हाच उपाय आहे. थोडक्यात, बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्याला पादाक्रांंत करीत असतील तर आपण त्या शस्त्रांचा उपयोग करून प्रतिहल्ला चढविणं अनिवार्य आहे. तेवढी बौध्दिक क्षमता आपल्या व्यवस्थापकांमध्ये निश्चितच आहे.

 हे साधण्यासाठी आपल्या संपूर्ण संस्कृतीलाच तिलांजली द्यायला हवी असं मुळीच नाही. आपली उपासना पध्दती आणि इतर सकारात्मक सवयी, ज्यांसाठी आपण 'भारतीय’ म्हणून जगात ओळखले जातो, त्या कायम ठेवूनही हे करता येतं. अनेक भारतीय उद्योगपतींनी ते करून दाखविलंं आहे. त्यांचा आदर्श सर्व भारतीय व्यवस्थापकांनी ठेवावयास हवा.

व्यवस्थापन शैलीत बदल आवश्यक/१५६