पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१५०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आला आहे. प्रारंभीच्या काळात मानवानं शेती आणि पशुपालनाची कला संपादन केली. त्यानंतर मालक व सेवक अशा दोन घटकांत समाजाची विभागणी झाली. मालकांची मालमत्ता आणि सुखलोलुपता वाढू लागली. तशी मालमत्तेची देखभाल करण्यासाठी सेवकांहून वरच्या पण मालकांपेक्षा खालच्या वर्गाची आवश्यकता निर्माण झाली. तेथे मध्यमवर्ग जन्माला आला. तो त्याचा पहिला ‘अवतार'.
 या अवतारात त्यानं विविध प्रयोग करून पारंपरिक शेती व पशुसंगोपन यात तांत्रिक प्रगती केली. याच सुमारास मध्यमवर्गात दोन गट पडले. एक गट मालकांची हांजी हांजी करून स्वतःच्या तुंबड्या भरण्यात दंग राहिला. सेवकवर्गाची पिळवणूक करण्यात मालकाला मदत करणं, कित्येदा मालकाच्या नावानं स्वतःच त्यांचं शोषण करणं आणि भरपेट फायदा करून घेणं हेच त्याचं ध्येय बनलं. कार्ल मार्क्सनं या वर्गाला ‘बुर्झ्वा’असं नाव दिलं आहे.
 दुसरा गट मात्र स्वतंत्र बाण्याचा होता. त्यानं कुणा एकाच्या आज्ञेत राहण्यापेक्षा स्वतःची वेगळी प्रतिभा विकसित केली. कृषिउपयोगी साधनं, वनस्पती व खनिजांपासून औषधं, धातूकाम, वस्त्र विणणं, चामड्याच्या वस्तू बनवणं इत्यादी तंत्रज्ञान विकसित केलं. पुराणात ज्या चौसष्ट कला व चौदा विद्यांचा उल्लेख आहे त्यांची निर्मिती व जोपासना याच गटानं केली. मीमांसाशास्त्र, न्यायशास्त्र अशा सामाजिक संस्थांची निर्मिती केली. ज्यांना या भौतिक बाबींमध्ये रस नव्हता, त्यांनी तत्त्वज्ञान, अध्यात्म, धर्म इत्यादींची निर्मिती करून त्याद्वारे विश्वाचं कोडं समजून घेण्याची जिज्ञासा जागृत केली.
 मधल्या कालखंडात राजसत्ता या संकल्पनेचा उदय झाला. त्यामुळं तर या गटाच्या प्रतिभेलां अस्मान ठेंगणं झालं. भूमीच्या प्रचंड तुकड्याला ‘राष्ट्र' असं संबोधलं जाऊ लागलं. त्यांच्या सीमा ठरल्या. राजसत्ता चालविण्यासाठी ‘सुशिक्षित’कर्मचारी वर्गाची आवश्यकता जाणवू लागली. राजाचा दरबार, प्रशासन, सैन्य आदी विविध क्षेत्रं या वर्गासाठी खुली झाली. स्वतःच्या बौध्दिक क्षमतेनं या वर्गानं राजसत्ता मजबूत केली तर राजसत्तेच्या या पाठिंंब्यानं हा वर्ग स्वतः मजबूत झाला. याच काळात कित्येक गरिबांचं मध्यमवर्गीयांमध्ये रूपांतर झालं. मध्यमवर्गीयांची संख्या वाढू लागली. हे महान क्रांतीकार्यच होतं. या कार्यामुळे माणसाचं पशुत्व संपून त्याचं माणूसपण आकाराला येऊ लागलं. धर्म, विज्ञान, कला, नीती आणि त्यांच्या मिलाफातून निर्माण होणारी संस्कृती यांनी मानवाची चहुमुखी विकास केला. ही क्रांती जवळजवळ तीन हजार वर्षे अव्याहतपणे सुरू होती.

 धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे निर्माते विविध ऋषीमुनी, आयुर्वेदाचे जन्मदाते सुश्रुत व चरक, बाण, कालिदासासारखे नाटककार, आर्यभटासारखा (कदाचित जगातला पहिला)

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/१४१