पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१५१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खगोलशास्त्रज्ञ, भास्कराचार्यासारखा गणिती, शंकराचार्यांसारखा तत्त्ववेत्ता, रामायण-महाभारतासारखा अप्रतिम काव्यात्म इतिहास लिहिणारे वाल्मिकी व व्यास व इतर असंख्य असामान्य व्यक्तिमत्त्वं आणि त्यांच्या कामगिरीचा रसिकतेने आस्वाद घेणारे इतर, हे सर्व त्या काळाचा विचार करता ‘मध्यमवर्गीय'च होते हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. एकंदर त्या वेळचा मध्यमवर्ग जिवंत, सळसळता , प्रवाही, सृजनशील व विजिगिषु वृत्तीचा होता हे इतिहासावर नजर टाकली असता कळून येतं. त्यानंतरही विविध वेळी त्या-त्या कालमानाला आवश्यक अशी क्रांती याच मध्यमवर्गाच्या अवतारांनी घडविली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या विशेषत: भारतातल्या मध्यमवर्गाचा 'अवतार' कसा आहे, लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या श्लोकातला जो ‘मी’ आहे, तो बनण्याचीक्षमता त्याच्यात आहे का? हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासंबंधी पुढच्या लेखात.

मध्यमवर्ग दसमाजाचे व्यवस्थापन/१४२