पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 उद्यमशीलतेच्या विनाशाच्या स्थानकाकडे चाललेल्या या प्रवासाचा वेग वाढवण्याचं काम खुशमस्करे व स्तुतिपाठक बजावतात.हांजी हांजी करून स्वतंची तुंबडी भरून घेणे हा त्यांचा ‘उद्योग' असतो. आपण सर्वश्रेष्ठ आहोत.सर्वसामान्यांप्रमाणे राबणे आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाही अशी भावना ते करून घेतात. या ‘अहं’पणाबरोबरच नव्या पिढीला ते ‘रम, रमा व रमी’च्या नव्या विश्वात घेऊन जातात. तेथे जुन्या पिढीतील कर्मठ उद्योजकांनी हाडाची काडंं करून बांधलेलं संपत्तीच धरण फुटतं. त्या लोंढ्यात ही नवी पिढी पार वाहून जाते.
 एखाद्या उद्योगपतीला एकाहून अधिक वारसदार असतील तर परिस्थिती अधिकच बिकट होते. खुशमस्करे या वारसदारांना एकमेकांपासून अलग पाडतात. प्रत्येक वारसदाराचं स्वतःचं कोंडाळ बनतं. राजकीय पक्षांत असते तशी गटबाजी सुरू होते. हे गट एकमेकांना शत्रुसमान मानतात.जीवघेणी स्पर्धा इतर उद्योगांशी न होता आपसांतच सुरू होते. एकमेकांना नामोहरम करण्यासाठी सर्व उपायांचा अवलंब होतो. इतके दिवस जोपासलेल्या उद्योग साम्राज्याची छकले उडतात. दरवर्षी न चुकता गोमटी फळे देणाच्या झाडाच्या फांद्यांची मोजदाद व वाटणी सुरू होते. वृक्ष कोसळतो.
 उद्योगपतीला कन्या असतील तर त्या व त्यांच्या सासरंची मंडळी मैदानात उतरतात. भारतीय परंपरेनुसार मुलीची भूमिका घरापुरतीच मर्यादित असते. मात्र या कन्या व त्यांना पुढे करून त्यांंच्या सासरची मंडळी ‘धंद्यात'लक्ष घालू लागतात. हे सर्व लक्ष घालणं धंद्याच्या कल्याणासाठी नसून स्वतःला त्याचा मोठ्यात मोठा लचका कसा तोडता येईल यासाठी असते. काही मुली आपले भाऊ किंवा पतींपेक्षा स्वतःला जास्त सक्षम समजतात. पण अशी उदाहरणं दुर्मिळ. बहुतेक जणी कौटुंबिक उद्योगांची विल्हेवाट लावण्यालाच हातभार लावतात.
 उद्योगांची वाटणी कधीच सरळपणे करता येत नाही. त्यातील पुष्कळ मालमत्ता अशा स्वरूपात असते की, ती विकून त्याचा पैसा केल्याखेरीज वाटणी करणं शक्य नसतं. मग मालमत्ता विकण्यासाठी वारसदारांकडुन दबाव येतो. कारण उद्योगाच्या हितासाठी स्वतःच्या अधिकाराचा त्याग करण्यास कोणीच तयार नसतो. उत्पादनक्षम मालमत्तेचे पैशात रूपांतर होते. वारसदारांच्या कुतरओढीत व्यवसायाची वाट लागते.
 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मोजक्याच महाराजांनी आपली संपत्ती उत्पादन वाढविण्यासाठी कारणी लावली. उरलेल्यांनी ती उपभोगली. त्यामुळे ती कालांतराने कमी कमी होत गेली. याच प्रकारे बड्या औद्योगिक घराण्यांचा भारताच्या औद्योगिक विकासातील वाटा दिवसेंदिवस घटत चालत आहे.कारण त्यांची संपत्ती नव्या पिढीतील ‘आधुनिक महाराजांच्या' तावडीत सापडली आहे.

 
नव्या युगाचे महाराज/ ४