पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १) महत्त्वाकांक्षेचा अभाव.  २) उद्योजकतेची किंमत नसणे.
 ३) स्तुतिपाठकांचा गराडा

महत्त्वाकांक्षेचा अभाव :
 लवकरात लवकर अधिकाधिक कमावण्याची जबरदस्त भूक हे पहिल्या पिढीतील उद्योगपतींचे स्वभाववैशिष्ट्य होते. स्व. धीरुभाई अंबानींंबद्दल त्यांचे पुत्र मुकेश लिहितात,‘त्यांना मुळीच दम धरवत नसे. प्रत्येक गोष्ट त्यांना ‘काल’ हवी असे आणि हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.'
 उद्योगपतींच्या नव्या पिढीत या महत्वाकांक्षेचा अभाव आहे. धंद्याचा व्याप वाढवण्यापेक्षा आहे ते राखणे व त्याचा उपभोग घेणे, असा मर्यादित विचार ते करतात. त्यांची प्राथमिकता ‘धंदा’ नसून त्यातून मिळणारा पैसा ही असते. यामुळे उत्पादनक्षम संपत्तीचं निरुपयोगी मालमत्तेत रूपांतर होत राहतं.
 पार्ले शीतपेय कंपनी व टाटा-बिर्लांंच्या सिमेंट कारखान्यांची विक्री याच संकुचित संकल्पनेपोटी करण्यात आली. हे उद्योग सुरू असताना होणाऱ्या फायद्यापेक्षा ते विकून जास्त फायदा झाला, अशी सारवासारव करून ते चालवण्यात आलेल्या अपयशावर नव्या पिढीकडून पांघरूण घालण्यात आलं. खरा उद्योगपती प्रतिभावंत खेळाडूप्रमाणे असतो. तो खेळाच्या आनंदासाठी खेळतो. बक्षिसासाठी नाही.

उद्योजकतेची किंमत :
 हाडाचा उद्योगपती मालमत्ता कवटाळून बसण्यापेक्षा उद्योगाचा विस्तार व प्रगतीला महत्व देतो. त्याला 'स्पर्धा' जीव की प्राण असते. माझ्या एका कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ‘कोलगेट पामोलिव्ह'चे अध्यक्ष म्हणाले होते, ‘कोलगेट भारतातील पहिल्या क्रमांकाची टूथपेस्ट आहे. हे सर्वोच्च स्थान दैवगत्या लाभलेले नाही. घाम गाळून मिळवावे लागले आहे आणि एकदा ते मिळाल्यानंतर रोज मिळवावे लागत आहे. (म्हणजेच ते टिकविण्यासाठी रोज झगडावे लागत आहे)
 हाडाचा उद्योगपती असे झगडण्यासाठीच जगतो. स्पर्धेचं जणू त्याला व्यसनच लागलेलं असतं. स्पर्धा जितकी जास्त तितकी त्याची व्यावसायिक प्रतिभा फुलून येते. प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान स्वीकारणे हे त्याचे जीवनध्येय असते. मात्र त्याची नवी पिढी हुजऱ्यांकडून मुजरे घेण्यात व छानछोकीत रमते. यशाची नवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी परिश्रमात बुडून जाण्याऐवजी ती गोल्फ कोर्स, शाही मेजवान्या आणि चैनीचे नवे मार्ग धुंडाळण्यात मग्न असते. परिणाम काय, तर जुन्या पिढीने स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी सुरू केलेले उपक्रम स्पर्धेपासून दूर पळण्यासाठी खुल्या बाजारात विकले जातात.

खुशमस्कऱ्यांची भूमिका :

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/३