पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आला. या भाषा अवगत झाल्या आणि त्याचा उपयोग पुढे माझे विचार प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी होत गेला. माझी व्याख्यानं आणि लेख वेगळ्या धाटणीचे वाटत ते माझ्या भाषाज्ञानामुळेच! चौफेर वाचनामुळे अनेक थोर साहित्यकृतींमधील अवतरणं मला तोंडपाठ आहेत. त्यांचा समर्पक उपयोग मी व्याख्यानं व लेखांमध्ये करीत असल्याने व्यवस्थापनासारखा क्लिष्ट विषय सोपा करणंं मला शक्य होई. तसेच इतर वक्त्यांपेक्षा माझी व्याख्यानं अधिक परिणामकारक होत असत.
माझा पहिला जॉब :
 कोणत्याही ‘पहिलेपणाची’ नवलाई अपूर्व असते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळणारी पहिली नोकरी आपण कधी विसरू शकत नाही. आपण काही करण्यास सक्षम आहोत ही जाणीव झाल्याने आपला आत्मविश्वास दुणावतो.
 मी १९५१ मध्ये केमिकल इंजिनिअर झालो. त्यावेळी देश नुकताच स्वतंत्र झाला होताआणि औद्योगिक क्षेत्र अविकसित होते. त्यामुळे इंजिनिअर्सना नोकऱ्या मिळविणं अवघड होतं. त्यावर्षी संपूर्ण देशातून केवळ १६ जणांना केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळाली व त्यापैकी फक्त सहा जणांना काम मिळालं.
 तथापि, माझे शैक्षणिक करिअर चांगलं असल्याने मला पदवीधर झाल्याबरोबर लगेचच एका अभियांत्रिकी सल्लागार संस्थेतून ऑफर आली. ही संस्था ‘इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग'या विषयाशी संबंधित होती.मात्र मी केमिकल इंजिनिअर होतो.त्यामुळे ऑफर कितीही आकर्षक असली तरी ती वेगळ्या क्षेत्रातील असल्याने स्वीकारावी की नाही अशा द्विधा मनःस्थितीत मी होतो.
 मी माझे प्राध्यापक डॉ. जी.पी. काणे यांचा सल्ला घेतला. त्यांनी मला ताबडतोब नोकरी स्वीकारण्यास सांगितलं. ‘ही कंपनी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमधील आहे आणि मी केमिकल इंजिनिअर आहे',अशी शंका व्यक्त करताच ते म्हणले, “अरे, तू अजून केमिकल इंजिनिअर आहेसच कुुठे? तू तर केवळ केमिकल इंजिअरिंगचा पदवीधर आहेस.दहा वर्षे या क्षेत्रात काम करशील तेव्हा कुठे स्वतःला केमिकल इंजिनिअर म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा होशील.तुला मिळालेली ऑफर तुझ्या पुस्तकी ज्ञानापेक्षा भिन्न क्षेत्रातील असली तरी अनुभवाने तू त्यातही प्रावीण्य मिळवशील.कोणत्याही परिस्थितीत तुझी शैक्षणिक पात्रता तुझ्या यशाच्या मार्गातला अडथळा बनता कामा नये.शैक्षणिक पात्रतेचा बाऊ करून तू नवनव्या क्षेत्रातील अनुभव मिळविण्याच्या संधी गमावू नको." मी हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोलाचा सल्ला मानतो. याचा उपयोग पुढच्या संंपूर्ण व्यावसायिक प्रवासात मला झाला आणि आजही होत आहे.

 अशा तऱ्हेने माझी पहिली नोकरी हा दुसरा महत्वपूर्ण टप्पा म्हणता येईल.

अद्भू्त दुनिया व्यवस्थापनाची/११७